अकोला- थंड वारा, पावसाळी वातावरण, आकाशात काळ्या मेघांनी केलेली गर्दी अन् सभागृहात एकापेक्षा एक सुरेल अशी, आला आला वारा, चिंब भिजलेले, बरसो रे मेघा मेघा सारखी पाऊसगाणी ऐकून अकोलेकर रसिक चिंब झाले. तर अनेकांनी या पाऊस गाण्यांवर नृत्य करत आपले पाऊसप्रेम व्यक्त केले. पर्यावरण शिक्षण प्रशिक्षण संशोधन व बहुउद्देशीय संस्थेद्वारा झाडोरा निसर्ग चळवळीअंतर्गत (कै.) म. ल. मानकर स्मृती वृक्षदान प्रकल्पाचा 15 वा वर्षा महोत्सव आज 2 ऑगस्टला दुपारी प्रमिलाताई ओक सभागृहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुधाकर गणगणे होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, माजी आमदार नारायण गव्हाणकर, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र गोपकर, हेमंत देशमुख, मनोहर रिधुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, वृक्ष पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रास्ताविकातून वृक्षमित्र रुपसिंह बागडे यांनी वर्षा महोत्सवाची वाटचाल मांडली. मान्यवरांनी पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन या वेळी केले. त्यानंतर सोनेरी उन्हात हिरव्या रानात या गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो? या एज्युविला पब्लीक स्कूल, पातूरच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीत, नृत्याने उपस्थितांची दाद मिळवली. सूत्रसंचालन रुपसिंह बागडे व माला बागडे यांनी केले.
बरसो रे मेघा मेघा..
प्रतिक्षा मोहोडने हवाके झोके आज मौसमोसे रुठ गये, आदित्य व र्शेयाने बहारदार नृत्य सादर केले. सन्मित्र पब्लीक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अग्गोबाई ढग्गोबाई, मनुताई कन्या शाळेने चुडीभी जिदपे आयी आहे, सन्मित्र ग्रुपने बरसो रे मेघा मेघा, नवरंग ग्रुपने ढगाळा लागली कळ, सन्मित्र पब्लीक स्कूलने आज दिल है पाणी पाणी, मनुताई कन्या शाळेने बरसो रे मेघा, नवरंग ग्रुपने लिफ्ट करा दे सादर केले. तर आकांक्षा तेलगोटेने आला आला वारा गीतावर नृत्य केले.
275 विद्यार्थ्यांचा महोत्सवात सहभाग
कार्यक्रमाचे आकर्षण असलेल्या शिवाणी बाठे, प्रविण मोहोड, दुर्गा गवई यांच्या एकापेक्षा एक सुरेल गीतांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. वर्षा महोत्सवात सुमारे 275 विद्यार्थ्यांनी नृत्य, गीताच्या माध्यमातून हजेरी लावली.