आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी सरपंचासह दोघांचा भीषण अपघातात मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - रामगावचे माजी सरपंच तथा भाजप शेतकरी आघाडीचे नेते शंकरराव मंगळे व दापुर्‍याचे नामदेवराव गावंडे यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना औद्योगिक वसाहतीत गुरुवारी पहाटे 3 वाजता घडली. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय मृतकांच्या नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

रामगावचे माजी सरपंच शंकरराव मुदृगराव मंगळे (वय 60) व दापुर्‍यांचे नामदेवराव गावंडे (वय 52) यांचा नेटवर्क मार्केटिंगचा व्यवसाय आहे. त्यामुळे ते नेहमीच बाहेरगावी व्यवसायानिमित्त जायचे. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी हे दोघेजण व्हिस्टा (एमएच 30- एफ- 314 ) वाहनाने जळगाव - नांदुरा येथे मार्केटिंग व्यवसायानिमित्त गेले होते. बुधवारी सायंकाळी नांदुर्‍यात नामदेवराव गावंडे यांचा मुलगा संदीप गावंडे याची दुचाकी बंद पडली. त्या ठिकाणी संदीपचे वडील नामदेवराव गावंडे व शंकरराव मंगळे यांची भेट झाली. त्या वेळी संदीपने या दोघांनाही लवकर घरी परता, असे सांगून संदीप बुधवारी रात्री 11 वाजता दापुरा येथे दुचाकीने घरी परतला. काही वेळातच संदीपला नाशिकच्या नाना कोलते यांचा दूरध्वनी आला. वडिलांचा मोबाइल लागत नसल्याचे त्यांनी संदीपला सांगितले. तेव्हा संदीपनेही आपल्या वडिलांच्या मोबाइलवर संपर्क केला असता मोबाइल लागत नव्हता.

सकाळी सिव्हिल लाइन पोलिसांना हा अपघात घडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले तेव्हा शंकरराव मंगळे व नामदेवराव गावंडे यांचा मृतदेह गाडीत आढळून आला. पोलिसांनी त्या दोघांचेही मृतदेह गाडीतून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सवरेपचार रुग्णालयात पाठवले. अपघातात गाडीचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणाची पोलिसांनी नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिली नातेवाइकांना माहिती
शंकरराव मंगळे आणि नामदेवराव गावंडे यांचा भीषण अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती सर्वप्रथम सिव्हिल लाइन पोलिसांनी मंगळे यांच्या नातेवाइकांना मोबाइलद्वारे दिली. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांना आणि गावातील नागरिकांना घटनास्थळी धाव घेतली.

गुरुवारी नामांकन अर्ज करणार होते दाखल
गुरुवारी दिवसांचा मुहूर्त काढून शंकरराव मंगळे यांच्या पत्नी म्हैसांग या पंचायत समिती गणातून आपला उमेदवारी अर्ज अकोल्यात दाखल करणार होत्या. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी काही तासांचा अवधी असताना बुधवारी रात्री शंकरराव मंगळे यांचा अपघातात संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. परंतु, त्यांचे कोणाशी वैर नव्हते. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव मंगळे याचा होता. झालेल्या अपघातामुळे अनेक तर्क-वितर्क काढल्या जात आहे.

शंकरराव मंगळे व नामदेवराव गावंडे यांच्या गाडीतून सिव्हिल लाइन पोलिसांनी लॅपटॉपची बॅग, मार्केटिंग कंपनीचे 100 ते 200 नागरिकांचे अर्ज, एक ड्रेस, काही बॅगा व दोघांचेही मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, पैशाची बॅंग लंपास करण्यात आली आहे.