आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात खंडणीबहाद्दरांचा उच्छाद; गावगुंडांच्या टोळ्या सक्रिय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शहरात खंडणीखोरांनी उच्छाद मांडल्याचे ऑगस्ट महिन्यात घडलेल्या घटनांवर नजर टाकल्यास दिसून येते. एकाच महिन्यात खंडणी उकळल्याच्या आणि मागणी केल्याच्या चार घटना घडल्या. 31 ऑगस्ट रोजी रात्री तर खंडणी न दिल्याने दोघांनी ऑटोरिक्षांचीच तोडफोड केली. त्यामुळे शहरातील पोलिसिंगवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांचा या खंडणीबहाद्दरांना मूक पाठिंबा आहे काय, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

अकोला शहरातील अनेक भागांमध्ये गुंडांच्या टोळ्या सक्रिय आहेत. अवैध धंद्यांच्या माध्यमातून हे गुंड आर्थिकदृष्ट्या गब्बर झाले आहेत. पोलिसही कारवाईचा देखावा करत वेळ मारून नेत असल्याचा आरोप होत आहे. या खंडणीबहाद्दरांमुळे परिसरातील व्यापारी त्रस्त झाले आहेत. एमआयडीसी परिसरातील उद्योजकांना खंडणीबहाद्दर वेठीस धरतात. खंडणी न दिल्यास तेथील कामगारांना हाताशी धरून उद्योजकांच्या विरोधात रान उठवतात.

खंडणीबहाद्दर बाजारपेठेत दहशत निर्माण करत असल्याने ग्राहकांनाही जीव मुठीत धरून खरेदी करावी लागते. महिलांमध्ये तर कमालीची असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या खंडणीबहाद्दरांच्या मुसक्या आवळण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

31 ऑगस्ट रोजी रात्री सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यावर खंडणीबहाद्दरांच्या विरोधात ऑटोरिक्षाचालकांनी धाव घेतली. खंडणीबहाद्दरांवर कारवाई करण्याची मागणी केली.

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रोज हातगाड्यांवर खाद्य पदार्थांची दुकाने थाटण्यात येतात. या ठिकाणी येणार्‍या ग्राहकांच्या दुचाकी झोपडपट्टी दादांच्या टोळ्या चोरून नेतात. तसेच काही वेळा ग्राहकांना लुटीच्या घटना घडतात. भीतीपोटी कोणी तक्रारही करीत नाहीत.

इराणी झोपडपट्टी, जनता बाजार, मध्यवर्ती बस्थानकामागील परिसर, जुने शहरात खंडणीखोरांनी उच्छाद मांडला आहे. झोपडपट्टी दादा या परिसरातील व्यापार्‍यांकडून नियमित खंडणी वसूल करतात. व्यापारीही भीतीपोटी तक्रार करीत नाहीत.

झोपडपट्टी दादांचा त्रास
ऑगस्ट महिन्यात जुने शहरात एक आणि सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात खंडणीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांमध्ये फिर्यादीला प्रचंड मारहाण करण्यात आली. दहशत निर्माण करण्याची एकही संधी खंडणीखोर सोडत नाहीत.

तक्रार केल्यास कारवाई करणार
व्यापारी, नागरिकांनी भीती न बाळगता तक्रार करावी. खंडणीखोरांवर कठोर कारवाई करण्यात येईल. खंडणीखोर आणि गुंडांना जरब बसण्यासाठी तडीपारीसारखी कारवाई करण्यात येते.
-अमरसिंह जाधव, शहर पोलिस उपअधीक्षक

मध्यवती बसस्थानकाजवळ असलेल्या हॉटेल सदाबहारवर दोन युवकांनी धुमाकूळ घातल्याची घटना 25 ऑगस्ट रोजी घडली होती. युवकांनी हॉटेलचे मालक विनोद गुप्ता (वय 62) यांना मारहाण करून हॉटेलच्या गल्लय़ातील 700 रुपये हिसकले होते.