आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळसूत्र विकून लाच दिली तरी वीज मिळेना, दांपत्याने घेतले विष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शेती पिकासाठी चार वर्षांपासून वीज जोडणी मिळत नसल्याने सागद (ता. बाळापूर) येथील एका शेतकरी दांपत्याने बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कारंजा (रमजानपूर) येथील महावितरणच्या उपकेंद्र कार्यालयात कीटकनाशक प्राशन केले. दिलीप मधुकर तायडे (३५) आणि राधा दिलीप तायडे (३०) अशी त्यांची नावे अाहेत. यापैकी दिलीप यांची प्रकृती चिंताजनक आहे.
तायडे यांना दोन भाऊ आहेत. त्यांच्या वाट्यावर दोन एकर शेती असून, त्यांचे आई-वडील, मुलगा साईनाथ (७), समर्थ (३) आणि स्वत: पती-पत्नी अशा सहा जणांचा उदरनिर्वाह शेतीच्या उत्पादनावरच होतो. सन २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने त्यांचे खरीप पीक हातचे गेले. त्यानंतर गारपिटीने रब्बी पिकाचे नुकसान झाले. सन २०१४ मध्ये अल्प पाऊस झाला. परिणामी, उत्पादन झालेच नाही. अशा नैसर्गिक संकटांमुळे तायडे कुटुंब हतबल झाले होते.

शेतात सिंचनाची सोय व्हावी, यासाठी त्यांनी महावितरणच्या कारंजा रमजानपूर कार्यालयात वीज जाेडणीची मागणी करून २० मार्च २०१२ रोजी ७ हजार ५०० रुपयांचे कोटेशन भरले होते. मात्र, तेव्हापासून या शेतकरी कुटुंबाला वीजजोडणी मिळाली नाही. दरम्यान, ‘वीज जोडणी देतो’ म्हणून गतवर्षी एका अधिकाऱ्याने त्यांच्याकडून १५ हजार रुपयांची लाच घेतली. त्यासाठी तायडे दांपत्याला मंगळसूत्र विकावे लागले. पण; त्यानंतर काहीच दिवसांत संबंधित अधिकाऱ्याची बदली झाली. परिणामी, त्यांची वीजजोडणी रखडली.

वीजजोडणी मिळावी यासाठी या वर्षभरात त्यांनी अनेकवेळा महावितरणच्या कार्यालयात चकरा मारल्या. पण; त्यांच्या पदरी निराशाच आली. याच मागणीसाठी तायडे दांपत्य बुधवारी पुन्हा महावितरणच्या कार्यालयात गेले. मात्र, अधिकाऱ्यांनी दलालामार्फत त्यांच्याकडे आठ हजार रुपयांची लाच मागितली. पण; सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे जवळ पैसेच नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, ‘पैसे नाही तर वीजजोडणी नाही’, असा पवित्रा अधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे दिलीप यांनी महावितरणच्या कार्यालयातच कपाशीवर फवारणीसाठी असलेले कीटकनाशक प्राशन केले. त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या पत्नी राधा यांनीही त्यांच्या हातून बाटली हिसकावून त्याचा घोट घेतला. त्या ठिकाणी असलेल्या इतर नागरिकांनी त्यांना तत्काळ अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती दिलीप यांचे लहान भाऊ पुरुषोत्तम तायडे यांनी दिली.

महिन्यातील चौथी घटना
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून शासकीय कार्यालयातच शेतकऱ्यांनी विष घेण्याची दीड महिन्यातील ही चौथी घटना आहे. २० मे रोजी हिवरखेड येथील विनोद खारोडे (२४) यांनासुद्धा महावितरणच्या कार्यालयात विष घेतले. त्यांचा मृत्यू झाला. त्यांनाही २० हजार रुपयांची लाच अधिकाऱ्याने मागितली होती, हे विशेष. त्यानंतर एकाच आठवड्यात पातूर येथील पंचायत समिती कार्यालयात नागेश्वर नागे या शेतकऱ्याने विष घेतले होते. त्यांची प्रकृती आता बरी आहे. पाचच दिवसांपूर्वी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तलाठ्याच्या जाचाला कंटाळून गजानन संपत भांबरे (३५) या शेतकऱ्यानेही विष घेतले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भावाले वाचवा...
^‘शासन शेतकऱ्याच्या इरोधातच हाय. गेल्यासाली एका साहेबाले १५ हजार देल्ले व्हते. आता नवा साहेब पुन्हा ८ हजार रुपये मागून राह्यला. आम्हाले लाइन नको. मातर माह्या मोठ्या भावाले वाचवा. त्याचे दोन लहान -लहान लेकरं हायेत.’
पुरुषोत्तम तायडे, दिलीप यांचा भाऊ