आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी नेते पोहरेंचा शासनावर आरोप, 'वीज, पाणी नसल्याने आत्महत्या'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विदर्भातील शेतकऱ्यांना महावितरणकडून वेळेवर वीज जोडणी दिली जात नाही, दिली तरी ती अधिकृत नसते. परिणामी, एकाच रोहित्रावरून अनेक अनधिकृत वीज जोडण्या असल्याने रोहित्रामध्ये वारंवार बिघाड होऊन सिंचनास अडथळा होतो. झालेले नुकसान शेतकरी सहन करू शकत नाहीत. त्यामुळे शेतकरी आत्महत्येस वीज आणि पाणी हीच दोन महत्त्वाची कारणे आहेत, असे मत शेतकरी नेते तथा ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी मंगळवार, २६ मे रोजी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.
पोहरे म्हणाले, विदर्भातील शेतकरी आत्महत्येपैकी ९० टक्के आत्महत्या या बागायतदार शेतकऱ्यांच्या आहेत. केवळ १० टक्केच कोरडवाहू शेतकरी आत्महत्या करतात. कारण कोरडवाहू शेतकरी त्यांच्या शेतामध्ये उत्पादन खर्च कमी करतात. उत्पन्न कमी होणार ही त्यांची मानसिकता असते. उलट बागायतदार अधिक खर्च करतात. पाणी, वीज यांच्या अभावामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागते. त्यातून ते आत्महत्या करतात.
आत्महत्येचे हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीतून बाहेर पडायला हवे. पशुपालनाचा जोडधंदा करायला हवा. शासकीय योजनेच्या साहाय्याने नवनवीन प्रयोग करायला हवेत, असा सल्लाही त्यांनी दिला. शिवाय त्यांनी स्वत: केलेल्या आधुनिक शेतीची माहिती दिली.
"वेदनंदिनी' ठरले सर्वोत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्र :प्रकाश पोहरे यांनी अवघ्या चार वर्षांमध्ये कल्पकता आणि परिश्रमातून कान्हेरी सरप येथे साकारलेल्या वेदनंदिनी कृषी पर्यटन केंद्राला पुण्यात झालेल्या आठव्या जागतिक कृषी पर्यटन दिन आणि राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळेत यंदाचा विदर्भातून सर्वोत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्राचा पुरस्कार मिळाला.
कार्यक्रमाला राज्याचे कृषी पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार, एमटीडीसीचे प्रकल्प अधिकारी मुकेश कुळकर्णी, कृषी पर्यटन दिन समारंभाचे अध्यक्ष अविनाश जोगदंड, ज्येष्ठ पत्रकार आदिनाथ चव्हाण, भगवान तावरे, अभिजित फाळके आणि कृषी पर्यटन विकास संस्थेचे संचालक पांडुरंग तावरे आदींची प्रमुख उपस्थिती होती, अशी माहितीही पोहरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
बातम्या आणखी आहेत...