आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंटामुक्त गावात ‘बंदोबस्त’ ठेवण्याची अाली वेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - शेतकऱ्यांचा जीवाभावाचा सोबती असलेल्या बैलांचा सण पोळा सोमवार,२५ ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात एक हजार ११० गावांमध्ये दरवर्षी प्रमाणे पारंपारिक पद्धतीने हा सण साजरा होणार आहे. विशेष म्हणजे तगड्या पोलिस बंदोबस्तात हा पोळा जिल्ह्यात साजरा होणार आहे. मात्र यंदा पोळ्यावर अवर्षणसदृश स्थितीचे सावट स्पष्टपणे दिसत आहे. पोळ्यात अपघात होऊ नये, म्हणून खबरदारीचा उपाय लक्षात घेऊन पोलिसांनी जिल्ह्यात बदोबस्त लावला आहे. तंटामुक्ती अभियान राबवणाऱ्या एकाही गावाने अजुनही पोळ्याचा बंदोबस्त नाकारल्याचे पत्र पोलिस स्टेशनला न दिल्याने पोलिस बंदोबस्त तगडा लावावा लागत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात एकूण १३ तालुके असून, ३१ पोलीस स्टेशन अंतर्गत या गावांना सुरक्षा पुरवल्या जाते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही हाताळल्या जाते. सण, उत्सवाला आता सुरुवात झाली असल्याने पोलिसांवरील ताण वाढला आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात साजरा होणारा पोळा उद्या आहे. पोळ्याच्या दिवशी यात्रेचे स्वरुप गावाला येते. लहान मुलांनाही पोळ्यात नेले जाते. या पोळ्यात बैलावरून वाद होतात. अशी काही जुने प्रकरणे लक्षात घेऊन बंदोबस्त लावण्याचे काम पोलिस प्रशासनाने हाती घेतले आहे. राज्यात बुलडाणा जिल्हा तंटामुक्ती अभियानात अग्रेसर आहे. या गावांनी पुरस्कार पटकावले आहेत. मात्र पोळ्याचा बंदोबस्त नाकारून पोलिसांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला नाही. आजपर्यंत बंदोबस्त नाकारणाऱ्या एकाही गावाचा अर्ज पोलिस प्रशासनाकडे प्राप्त नव्हता. त्यामुळे आजपासूनच बंदोबस्ताचे तयारीला पोलिस लागले आहेत. या सणानंतर येणाऱ्या गणेशोत्सवाचा ताणही आता पोलिसांवर
वाढणार आहे.

आज पोळयाचा बाजार
सोमवारी पोळा येत असल्यामुळे बुलडाण्यातील रविवारच्या आठवडी बाजारात गर्दी होण्याची शक्यता आहे. यावेळी दुष्काळी परिस्थिती असली, तरी सर्जा राजाला सजवण्यासाठी शेतकरी मागेपुढे पाहणार नाहीत. या बाजारातही पोलिस बंदोबस्त राहणार आहे.
१६० संवेदनशील ठिकाणे
जवळपास १६० ठिकाणांची नोंद पोलिसांनी घेतलेली आहे. या ठिकाणी पोलिसांना चाेख बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. उपद्रवी घटकांकडून सणच भांडण्यासाठी निवडण्यात येतो. खामगाव शहर व ग्रामीण, तामगाव, नांदुरा, जळगाव जामोद, धामणगाव बढे या तालुक्यात दहापेक्षा अधिक ठिकाणे आहेत.
व्यापाऱ्यांना लागली चिंता
जिल्ह्यात अवर्षण सदृश स्थिती आहे. याचा परिणाम पोळ्याच्या पार्श्वभूमीवर भरणाऱ्या जिल्ह्यातील काही बाजारपेठांमध्ये दिसून आला. पोळ्याच्या पूर्वसंध्येला हा बाजार आल्याने पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग वृषभराजाच्या या सणासाठी साहित्याची खरेदी करण्यासाठी गर्दी करेल, असे चित्र आहे. मात्र अवर्षणसदृश स्थिती पाहता प्रत्यक्षात बाजारपेठेत िकती गर्दी होईल, या बाबत शंका आहे.
राज्य राखीव दलाची एक तुकडी
पोळ्याचा सण साजरा करताना कुठेही कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिस प्रशासनाने बंदोबस्त लावला आहे. त्यात एक राज्य राखीव दलाची तुकडी आहे. ५०० गृहरक्षक दलाचे जवान, १०० महिला जवान आहेत. ३१ पोलिस स्टेशन अंतर्गतचे तसेच पोलिस दलातील ७५ टक्के पोलिस असा बंदोबस्त लावण्यात आला आहे.