आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी आत्महत्या कृषक संस्कृतीच्या ऱ्हासाचे लक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - काळाबराेबरधावताना युवकांना डाेळ्यासमाेर ठेवून बदल करणे आवश्यक आहे. शेतीवर आधारित आर्थिक व्यवस्था जाेपर्यंत बळकट होणार नाही, तोपर्यंत कोणत्याही क्षेत्राचा विकास शक्य नाही. नैराश्यातून सध्या हाेत असलेल्या तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे, कृषक संस्कृतीच्या ऱ्हासाचे लक्षण आहे. तुटत चाललेला संवाद हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागचे मूळ कारण आहे. त्यामुळे संवादाचा धागा मजबूत करण्याची गरज आहे आणि ही ताकद ग्रामगीतेत आहे. ग्रामगीतेमुळेच गावातील एकोपा टिकवता येणार आहे, असा सूर पूज्य तुकारामदादा गीताचार्य साहित्यनगरी येथे दुसऱ्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या ‘राष्ट्रसंतांचे साहित्य पत्रकारिता’ याविषयावरील परिसंवादात उमटला.
परिसंवादाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने यांनी देशाचे भविष्य हे युवकांच्या हाती आहे. त्यांच्या स्वप्नांना पायबंद घालण्यापेक्षा त्यांना फुलू द्या. आणि असे झाले, तर आरोग्यापासून आर्थिक क्षेत्रापर्यंत सुदृढ समाज, समृद्ध समाज निर्माण होईल. यासाठी आवश्यक असलेली सामूहिक शक्ती राष्ट्रसंतांच्या विचारात आहे. काळाच्या गरजेनुसार समाजात परिवर्तन होणे गरजेचे आहे, असे मत मांडले.
"दिव्य मराठी'चे कार्यकारी संपादक सचिन काटे यांनी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर होतो ही बाब प्रशंसनीय आहे. मात्र, राष्ट्रसंतांना देव मानून त्यांना देव्हाऱ्यात बसवणे कितपत योग्य याचा विचार करणे आवश्यक आहे. राष्ट्रसंतांना देव्हाऱ्यात बसवून एक प्रकारे आपण त्यांच्या विचारांना पूर्णविराम देतो. त्यांचे पूजन करण्याऐवजी त्यांच्या विचारांचे आचरण करणे म्हणजे, त्यांचे खरे पूजन आहे. नुसते विचार मांडण्यापेक्षा कृतिशील गुरुदेव भक्त घडण्याची आज गरज असून, विचारांच्या आचरणाने राष्ट्रसंतांचा प्रचार व्हावा, असे मत व्यक्त केले. जीवन जगण्याची कला ग्रामगीतेत सांगण्यात आली आहे. आज माणसांची गर्दी मिळते. पण, माणुसकी कुठेतरी हरवली आहे. चांगल्या समाजासाठी ग्रामगीता प्रत्येक गावात, प्रत्येक घरात वाचली गेली पाहिजे, असे विचार ज्येष्ठ पत्रकार अॅड. सुधाकर खुमकर यांनी मांडले. ग्रामगीतेतील एक जरी अध्यायाचे वाचन केले, तरी समस्यांतून मार्ग सापडतो. ग्रंथांचा ग्रंथ म्हणजे ग्रामगीता आहे. याचे नुसते वाचन नाही, तर आचरण प्रत्येकाने करावे, असे धनंजय मिश्रा यांनी सांगितले. ग्रामगीता व्यक्तीला शारीरिक, मानसिक, आर्थिक नैतिकदृष्ट्या सक्षम बनवते. एखाद्याचे हृदय परिवर्तन, विचार परिवर्तन करण्याची ताकद ग्रामगीतेत आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रा. मधू जाधव यांनी व्यक्त केले. प्रत्येकाने ग्रंथरूप गुरू बनवण्याची आवश्यकता असल्याचे मत प्रा. यादव वक्ते यांनी मांडले. या सत्राचे सूत्रसंचालन गोपाल गाडगे, तर आभार प्रदर्शन अॅड. अनंत गावंडे यांनी केले. या वेळी डॉ. मोहन खडसे, नीरज आवंडेकर, महेंद्र कविश्वर, विजयसिंह सोळंके, प्रा. उदय देशमुख, डॉ. संतोष हुशे यांची उपस्थिती होती.