आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmers News In Marathi, Hailstorm, Divy Marathi, Akola

46 हजार गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना विशेष पॅकेजअंतर्गत मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अकोला जिल्ह्यात 46 हजार गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना विशेष पॅकेजअंतर्गत लवकरच मदत मिळणार आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात प्रशासनाच्या स्तरावर शेतकर्‍यांचा अंतिम पाहणी अहवाल तयार झाला असून, निधी मिळवण्याचे प्रयत्न शेवटच्या टप्प्यात आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.


मार्च व फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे साकडे घालत निवडणूक आयोगाकडून मदत मंजूर करून आणली. या मदतीनुसार अकोला जिल्ह्यात सर्वाधिक फटका हा बाश्रिटाकळी तालुक्यातील शेतकर्‍यांना बसला आहे. सर्वाधिक शेतकरी हे मूर्तिजापूर तालुक्यातील आहेत. अकोट तालुक्यात कुठलेही नुकसान झाले नाही. त्यामुळे तेथे कुठलीही मदत देण्यात येणार नाही.


किती शेतकर्‍यांना मदत : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील सर्वाधिक मदत मूर्तिजापूर तालुक्यातील 13 हजार 500 शेतकर्‍यांना मिळणार आहे. या तालुक्यातील 100 गावे बाधित झाली आहेत. बाश्रिटाकळी तालुक्यातील 125 गावांमध्ये सुमारे 11 हजार 500 शेतकर्‍यांना मदत देण्यात येणार आहे. पातूर तालुक्यातील 30 गावातील सात हजार 500 शेतकर्‍यांना मदत देय राहील. बाळापूर तालुक्यातील 60 गावातील सहा हजार 500 शेतकरी मदतीसाठी पात्र राहतील. अकोला तालुक्यातील 40 गावांमध्ये सहा हजार 500 शेतकर्‍यांना ही मदत देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. तेल्हारा तालुक्यातील 30 गावातील 1300 शेतकर्‍यांना मदत मिळेल.


पन्नास टक्क्यांच्या आत नुकसान झालेल्या शेतकर्‍यांमध्ये जिल्ह्यातील 24 हजार शेतकर्‍यांचा समावेश आहे. शासनाच्या निकषात यांचा समावेश होणार नसल्याने त्यांना मदत मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. पन्नास टक्क्यांच्या आत सुमारे 10 हजार हेक्टरवरचे नुकसान आहे. या शेतकर्‍यांना विशेष पॅकेजच्या निकषानुसार मदत देता येणार नसल्याची माहिती मिळाली. शासनाच्या निकषामुळे काही शेतकर्‍यांना मदत मिळणार आहे.