आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलानेच मागितला मुलाला निर्वाह भत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - वय८० वर्षे, वर्ग १ च्या अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांना ३० हजार रुपये प्रतिमाह पेन्शन. त्यात त्यांचा उदरनिर्वाह अतिशय चांगल्या प्रकारे होणार नाही, असे कुणी म्हणू शकत नाही. त्यांना दोन मुले आहेत. त्यापैकी एका मुलाकडे या आजोबांनी निर्वाह भत्त्याची मागणी केली. मुलाने नकार दिल्याने त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसात तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी वडील आणि मुलाची समजूत काढून प्रकरण मिटवले.

आपल्या मुलांसाठी हयातभर पै अन् पै गोळा करून मुलांचे जीवन सुखी व्हावे, अशी इच्छा बाळगून असणारे माता-पिता आपण पाहतो. मात्र, या विपरीत एक घटना शहरातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत उजेडात आली. घटना अशी आहे की, पिता वर्ग च्या पदावर होते. त्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. त्यांना दोन मुले आहेत. एक मुलगा डॉक्टर आहे. तो जिल्ह्याबाहेर राहतो, तर दुसरा मुलगा खासगी नोकरी करतो. दोन्ही मुले कमावते आहेत. मुलगा आणि वडिलात फारसे पटत नाही. त्यामुळे पिता-पुत्र वेगवेगळे राहतात. माझ्याच घरात राहत असल्यामुळे आणि माझा वृद्वापकाळात सांभाळ करण्याची जबाबदारी असताना ते करत असल्यामुळे पित्याने मुलाकडे १० हजार रुपये प्रती महिन्याप्रमाणे निर्वाह भत्त्याची मागणी केली. मात्र, वडिलांनाच ३० हजार रुपये पेन्शन असताना आपण पैसे देणार नाही, असे मुलाने वडिलांना सांगितले. त्यावर वडिलांनी थेट पोलिस ठाणे गाठले. पोलिसात मुलाविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी सुरुवातीला समजावण्याचा प्रयत्न केला आणि प्रकरण घरगुती असल्यामुळे समज देऊन त्यांना परत केले.

मात्र, वडिलांनी हार मानता उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांकडे मोर्चा वळवला. त्यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी वडील आणि मुलाला बोलावून घेतले. दोघांनाही त्यांच्या जबाबदार्‍यांविषयी अवगत केले आणि घरी पाठवले.

वडील काय म्हणतात...
मुलगा असल्यामुळे त्याने वृद्धापकाळात माझा सांभाळ करणे हे त्याचे कर्तव्य आहे. मात्र, तो माझ्याकडे लक्ष देत नाही. त्याच्याशिवाय मला दुसरा आधार नाही. डॉक्टर मुलगा जवळ राहत नाही. त्यामुळे मला जरी पेन्शन मिळत असेल तरी त्याची जबाबदारी आहे की नाही. त्यामुळे त्याने मला निर्वाह भत्ता द्यावा, त्याला बेदखल करण्याचा प्रश्नच नाही. पोलिसांनी न्याय केेला नाही.

काय म्हणतो मुलगा...
लहानपणापासूनच वडिलांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी शिक्षणाकडेही लक्ष दिले नाही. आजोबा-आजीने मला शिकवले. वडील नोकरीवर असताना त्यांनी माझ्यापेक्षा भावाकडे लक्ष दिले. तो आज डॉक्टर आहे. वडीलांना पैसे मागण्याची काही आवश्यकता नाही.

वडील या नात्याने त्यांचा माझ्यावरील हक्क बरोबर आहे. मात्र, त्यांना ३० हजार रुपये पेन्शन असल्यामुळे त्यांनी केलेली १० हजार रुपये महिन्याची मागणी योग्य नाही. त्यांचा मला त्रास देण्याचा प्रयत्न आहे आणि घरातूनही बेदखल करण्याचा प्रयत्न दिसून येतो.