आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचवीच्या पुस्तकांच्या किमतीत दुपटीने वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - 1 ते 14 वर्षांपर्यंत मोफत शिक्षणाची तरतूद असताना दुसरीकडे शिक्षण घेणे, हे दिवसेंदिवस महागाईचे होत आहे. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून पाचवीच्या अभ्यासक्रमात बदल झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा पाचवीच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची किंमतही दुपटीने वाढली आहे.
गेल्यावर्षी इयत्ता तिसरी आणि चौथीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला. यंदा पाचवीच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. मात्र, बदल करत असताना पुस्तकांच्या किमतीत बालभारतीने भरमसाट वाढ केली आहे. गेल्या वर्षी पाचवीची पुस्तके ११३ रुपयांना मिळत होती. त्याची किंमत आता २३१ रुपयांवर पोहोचली आहे. पूर्वी सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल अनुक्रमे १५, १३ १९ रुपयांना मिळत होती. आता या विषयाचे पुस्तक नसून परिसर भाग आणि परिसर भाग या नावाने वेगवेगळी आकर्षक पुस्तके तयार करण्यात आली असून, या पुस्तकांची किंमत ५७ आणि २८ रुपये आहे.
बालभारती, गणित आणि माय इंग्लिश बुकाच्या किमतीही दुपटीने वाढल्या आहेत. पूर्वी गणिताचे पुस्तक १८ रुपयांना मिळत होते, त्याची किंमत दुप्पट झाली असून, ते ३६ रुपयांना बाजारात उपलब्ध आहे. २० रुपयांना मिळणारे इंग्रजीचे पुस्तक आता ४० रुपयांना मिळत आहे. पूर्वी पाचवीची पुस्तके दोन कलरमध्ये होती आता हीच पुस्तके चार कलरमध्ये आहेत. नवीन पुस्तकांचा आकार मोठा झाल्याने किमती वाढल्याचा दावा बालभारतीने केला आहे.
अभ्यासक्रमात बदल झाल्यानंतर जुनी पुस्तके रद्दीत पडतात आणि नवीन पुस्तके घेण्यावाचून पर्याय राहत नाही. आता पाचवीनंतर सहावीचाही अभ्यासक्रम पुढील वर्षी बदलणार आहे. त्यामुळे विविध विषयांच्या अभ्यासक्रमांची पुनर्रचना करताना त्यांच्या पुस्तकांच्या किमती सर्वसामान्यांना परवडतील, अशा स्वरूपात असाव्यात, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.