आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साइड देण्यावरून अकोल्यात दोन भिन्न समाजात दगडफेक; भांडपुऱ्यामध्ये तणाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातील भांडपुरा चौकामध्ये मंगळवार, २१ एप्रिलच्या रात्री साइड देण्यावरून एक दुचाकी आणि ट्रकचालकाच्या भांडणाचे रूपांतर दोन समाजाच्या वादात झाले. दरम्यान, दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक झाली.
शिवाय परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आलेल्या पोलिस पथकाच्या वाहनासह इतर वाहनांची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी दोन्ही गटांच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
शहरातील भांडपुरा चौकामध्ये मंगळवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास महादेव सांगे आणि त्यांच्या मागे बसलेले राहुल मदगूल यांच्यासह अन्य एक जण दुचाकीने (एमएच ३० एसी ७१६९) जात होते. दरम्यान, साइड देण्याच्या कारणावरून एमएच २६ एच ५४१९ या क्रमांकाचा ट्रकचालक सय्यद आसिफ सय्यद मन्सर आणि क्लीनर मुस्ताक यांच्यात वाद झाला.
दरम्यान, दोघांनीही आपआपल्या समाजाच्या १० ते १५ व्यक्तींना बोलावून एकमेकांवर प्रचंड दगडफेक केली. शिवाय पोलिसांच्या वाहनासह इतर वाहनांची तोडफोड केली. परिणामी, या भागात काही काळ तणाव निर्माण झाला. जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी घटनास्थळी येत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, दंगल नियंत्रण पथक पाचारण करण्यात आले होते. या परिसरात रात्रभर तगडा पोलिस बंदोबस्त होता. आता परिस्थिती नियंत्रणात असून, नायक पोलिस रामेश्वर कथलकर यांच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी मंगेश सांगे, राहुल मदगूल आणि सय्यद आसिफ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बालाजी सवंडकर करत आहेत.