आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटीतही शहरातील चित्रपटगृहे ओस; केवळ 40 टक्केच प्रेक्षक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - उन्हाळ्याच्या सुटीत चित्रपट पाहणार्‍यांची संख्या वाढत असते. यंदा मात्र चित्र उलट आहे. सुटी लागूनही शहरातील पाच चित्रपटगृहांत सरासरी 40 टक्केच प्रेक्षक असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. या 40 टक्क्यांतही 30 टक्के यंगस्टर अर्थात महाविद्यालयीन युवक-युवतींचाच समावेश जास्त असल्याचे चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांतर्फे सांगण्यात आले. विदर्भातील चित्रपट वितरक (सिटी सर्किट) संस्थेच्या अकोला शाखेनेही दुजोरा दिला आहे.

दिवसेंदिवस विस्तीर्ण होणार्‍या खासगी केबल वाहिन्यांच्या जाळ्यामुळे चित्रपटगृहात प्रेक्षकांची संख्या रोडावत चालली आहे. शहरातील चित्रपटगृहांचा (गल्ला) व्यवसायही 40 टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षभरात एखाद दुसरा चित्रपट सोडला, तर चित्रपटगृहासमोर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकल्याचे पाहावयास मिळाले नाही. नवीन चित्रपट लागला तरी चित्रपटगृहात सुरुवातीचे दोन तीन दिवस थोडीफार गर्दी होते. मात्र लवकरच ती ओसरते. मध्यंतरी काही चित्रपटांचा अपवाद सोडला, तर दुसर्‍या फार तर तिसर्‍या आठवड्यात चित्रपट बदलावाच लागतो. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी एक चित्रपट दोन ते तीन महिने किंबहुना त्यापेक्षाही जास्त काळ चालत असे. अनेक जुन्या चित्रपटांनी गौरवशाली शंभर दिवस पूर्ण केले आहेत. तीस वर्षांपूर्वीचा चित्रपटसृष्टीतील तो सुवर्णकाळ होता.

‘निकाह’, रिगल चित्रपटगृहातील ‘शान’, न्यू प्लाझा (र्शावगी) चित्रपटगृहातील ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’ अशा एक ना अनेक चित्रपटांचे गौरवशाली शंभर दिवसांचे चित्रपटगृहाबाहेर लागलेले फलक आजही जुन्या पिढीतील अनेकांच्या डोळ्यापुढे तराळत असतील. त्यानंतरच्या दशकातील ‘राम तेरी गंगा मैली’, ‘तेजाब’, ‘दिल’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘हम है आपके कौन’ यांसारख्या चित्रपटांनीही हाऊसफुल्लचे बोर्ड झळकवले. या गाजलेल्या चित्रपटांच्या तिकिटांचा काळाबाजार केला जात असे. त्याला ब्लॅक करणे, असे म्हणत. या ब्लॅकवरही अनेकांचा त्याकाळी उदरनिर्वाह होत असे. परंतु, अलीकडच्या पंधरा वीस वर्षांत केबलचा जमाना आला. घरोघरी रंगीत टीव्ही, एलसीडी, व्हीसीडी, डीव्हीडी प्लेअर आले. अनेकांनी घरीच चित्रपट पाहणे पसंत केले. पूर्वीच्या काळी सहकुटुंब चित्रपट पाहायला जाण्याची प्रथा होती. आता ती मोडीस निघाली. प्रेक्षकवर्ग उरला तो फक्त नवविवाहित जोडपी आणि तरुणाईचा. नवा चित्रपट लागला की, तरुणाई तो पाहण्यासाठी हजेरी लावत असल्याने चित्रपटगृहे कसेबसे तग धरून आहेत.

बिग बजेट चित्रपटाचा अभाव
सध्या वाढलेले ऊन, सुट्यांमुळे बाहेरगावी जाण्याचे प्रमाण वाढले तसेच बिग बजेट चित्रपटाचे प्रदर्शन न झाल्याने शहरातील चित्रपटगृहांतील प्रेक्षकांची संख्या रोडावली आहे. हॉलीडे हा अक्षयकुमारचा बिग बजेटचा चित्रपट 6 जूनला प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकसंख्या वाढेल. अनंत गावंडे, प्रतिनिधी, चित्रपट वितरक (सिटी सर्किट) अकोला