आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येकाला प्रथमोपचाराची माहिती असणे आवश्यक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणावाची परिस्थितीतून अपघात, नैसर्गिक आपत्तीसारखे कधीही संकट ओढवू शकते. अशावेळी नेमका काय उपचार करावा, याची माहिती प्रत्येक व्यक्तीला असणे गरजेचे असून, त्यातून योग्य उपचार साधले गेले, तर मृत्यूसारखे संकट दूर करता येते. यासाठी प्रथमोपचाराच्या शिबिराची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. किशोर मालोकार यांनी येथे केले.
इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे हॉटेल वेलकम इन येथे 11 ते 14 जूनदरम्यान आयोजित प्रथमोपचार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बुधवारी ते बोलत होते. ते म्हणाले की, अपघात, हृदयविकार, सर्पदंश, शॉक लागणे, फिट येणे यासह इतरही नैसर्गिक संकटाच्या वेळी रुग्णाला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यापूर्वी काही प्राथमिक उपचाराची गरज असते. घटना घडताक्षणी योग्य ते उपचार तातडीने मिळाले, तर रुग्ण बचावू शकतो. त्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना, मित्रांना अथवा नजीक असलेल्या प्रत्येकाला प्राथमिक उपचारांची माहिती असणे गरजेचे आहे, अशी माहिती प्रथमोपचार शिबिराच्या माध्यमातून शिकता येते.

शिबिरात मुंबई येथील राज्य समन्वयक तेजल देशपांडे यांनी प्रशिक्षणाचे स्वरूप सांगितले. अँड. एस. एस. ठाकूर, राज्य समन्वयक भगत जोईल यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात अकोला, अमरावती, धुळे, जळगाव, नागपूर येथील जवळपास 35 शिबिरार्थ्यांचा सहभाग आहे. या वेळी रेड क्रॉस सोसायटीचे मानद सचिव प्रभजितसिंह बच्छैर, अली अकबर, खामोशी, प्रशांत राठी, जितेंद्र सोनटक्के, अँड. महेंद्र साहू, मोहन काजळे, मनोहर हरणे यांच्यासह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. जनक हॅन्ड्री डेनॉट यांच्या प्रतिमा पूजनाने प्रशिक्षणाची सुरुवात झाली.
शेवटच्या दिवशी होणार परीक्षा

गुरुवारी स्वप्निल बढे सीपीआरबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय भाजणे, विजेचा शॉक, सर्पदंश याविषयी प्रशिक्षण देण्यात येईल. 13 जूनला हाड मोडल्यास प्रथमोपचार, रुग्णाला हॉस्पिटलमध्ये हलवताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करण्यात येईल. 14 जूनला कुपोषणावर डॉ. अंजली राजवाडे माहिती देतील. त्यानंतर शिबिरार्थ्यांची लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेनंतर शिबिराचा समारोप होणार आहे. या शिबिरात चार दिवस विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.