आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धान्याची नासाडी; गरिबांच्या तोंडातील घास मातीमोल..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अन्न हे पूर्णब्रह्म आहे असे म्हटले जाते. मात्र, जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत येणारे धान्य वाटपापासूनच वादात अडकलेले असून, ते सरकारी गोदामात सडत आहे. आधीच दोन महिन्यांपासून धान्य नव्हते आणि आता धान्य आले आहे, तर गोदामात नासाडी होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामागे सरकारी धान्य गोदाम आहे. यामध्ये अकोला शहर व ग्रामीण विभागाचे धान्य ठेवले जाते. शहरातील 125 आणि ग्रामीणअंतर्गत असणारे 175, असे एकूण 300 कार्यान्वित स्वस्त धान्य दुकानांना गोदामातील गहू, साखरेसारखे धान्य पुरवण्यात येते. मात्र, या वितरण प्रणालीत मार्च 2014 पासूनच अनियमितता आहे. धान्यपुरवठा करण्याकरिता ललित शर्मा आणि अनिल शर्मा या दोन ठेकेदारांना कंत्राट देण्यात आला आहे. दोन्ही ठेकेदारांना परवडत नसल्याने त्यांनी मार्च महिन्यात पुरवठा बंद केला होता. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांनी 5 जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पुरवठा अधिकार्‍यांच्या मध्यस्थीने बंद मागे घेण्यात आला. गोदामात 1 ते 7 जूनदरम्यान साखर, तांदूळ व गहू आलेले आहेत. केंद्र शासनाच्या एफसीआय (फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया)मार्फत हा धान्यसाठा शासकीय धान्य गोदामात पुरवला जातो. गेल्या आठवड्यात आलेला हा माल दुर्गंधीयुक्त असल्याचे आढळून आले, तर तांदूळ व गव्हाचा दर्जाही निकृष्ट असल्याचे दिसून आले.

धान्याची नासाडी

गोदामातील गहू व तांदूळ सुस्थितीत न ठेवण्यात आल्याने त्याची नासाडी होत आहे. पोते फाटलेली असून, उंदीर ताव मारीत आहेत. तांदळाच्या पोत्यांच्या बाजूलाच जुनी कार्टून बॉक्स ठेवण्यात आल्याने त्यात उंदराचे वास्तव्य आहे.
पोते जमिनीवरच
साखर, गव्हाचे पोते हे जमिनीवरच ठेवले आहे. त्याठिकाणी ताडपत्री नाही. त्यामुळे या धान्याला दुर्गंध सुटला आहे. मात्र, याकडे संबंधित कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष आहे. यामुळे धान्याची नासाडी होत आहे.

गोदाम बनले खंडर

धान्य गोदाम हे जुन्या पद्धतीचे असून, या ठिकाणी पुरेसा प्रकाश येत नाही. शिवाय फरशी उखडलेली असल्याने धान्याचे पोते आणतानाच फाटतात. ती तशीच ठेवली जातात. त्यामुळे उंदीर, घूस आदी प्राणी धान्याची नासाडी करत आहे. आजच्या तारखेत गोदामाची एखाद्या खंडरसारखी स्थिती झाली आहे.