आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुराचे पाणी साचलल्‍याने नागरिकांचे आरोग्‍य धोक्‍यात !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जोरदार पावसामुळे नागरिक सुखावले असले तरी शहराच्या अनेक खोलगट तसेच पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसलेल्या परिसरात साचलेल्या पाण्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. 24 जुलैला पावसाने विश्रांती घेतली असली तरी साचलेल्या पाण्याने आपली जागा सोडलेली नाही. यामुळे अनेक भागांतील नागरिकांना दोन ते तीन फूट पाण्यातून मार्ग काढत घर गाठावे लागत आहे.

नाल्यांची योग्यरीत्या साफसफाई न झाल्याने पावसाचे पाणी वाहून गेले नाही तर खोलगट भागातील पाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्याने अनेक भागांत पाणी साचले आहे. अनेक रस्त्यांवरील पाणी वाहून गेले, परंतु अस्ताव्यस्त ले-आउट असलेल्या भागात पावसाचे पाणी साचलेले आहे. जुने शहरातील महापालिका क्षेत्र तसेच भौरद ग्रामपंचायतअंतर्गत येणार्‍या उपनगरांमध्ये ही समस्या उग्र झाली आहे. पाच ते दहा वर्षांपूर्वी मंजूर झालेले ले-आउट केवळ कागदोपत्री झालेले आहेत. त्यामुळे एका मंजूर ले-आउटच्या बाजूला नव्याने झालेल्या ले-आउटचे रस्ते, सांडपाणी वाहून नेणार्‍या नाल्या यांचा ताळमेळ साधलेला नाही. त्यामुळे पाणी वाहून जाण्याची समस्या तीव्र झाली आहे. जुने शहरातील रेणुकानगर, अयोध्यानगर, चिंतामणीनगर, सोपीनाथनगर आदी भागामध्ये घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
अशी घ्या काळजी
  • पाण्यात ओआरएस, मेडिक्लोर व क्लोरिनचा वापरा.
  • कूलर, टायरट्युब, कुंडीमध्ये पाणी साचू देऊ नका.
  • आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा.
  • दूषित पाणी टाळा, लहान मुलांना पाणी उकळून पाजा.
फवारणीही नाही : मनपा आरोग्य विभागाने कीटकनाशक फवारणी करणे गरजेचे होते. साचलेल्या पाण्यात किमान फवारणी, रस्त्यालगत बीएसस्सी पावडर टाकावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वाहून गेलेल्या चालकाचा मृतदेह सापडला : तेल्हारा तालुक्यातील रौंदळा येथील चाणक्य नाल्यात ट्रक (एमएच 40 एच 1190 )अडकून पडला होता. चालक सुरेश यादव व क्लीनर हे दोघे वाहून गेले होते. यापैकी चालकाचा मृतदेह सापडला.
पिके वाहून गेलीत : पूर्णा, निगरुणा, काटेपूर्णा नदीकाठच्या शेतामधील पिकांची संततधार पावसाने मोठी हानी झाली. या आठवड्यातच शेतकर्‍यांनी पेरली केली होती. त्यामुळे जमिनीवर लहान अंकुर उगवले होते. हे अंकुर खुडून वाहून गेले.
पुरामुळे वाहतुकीस अडथळा : अकोला ते अकोट मार्गावर असलेल्या पूर्णा नदीला मोठा पूर आला. जवळपास 7 फूट पाणी पुलावरून वाहत होते. पुलावरील गाळ साफ करण्याचे काम सुरूच होते. दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक बंद करण्यात आली होती.