आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For 7 Post So Many Application Comes In Akola City For Bjp

सात जागांसाठी शेकडोंच्या रांगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडणूक लढवू इच्छिणार्‍या उमेदवारांचे अर्ज मंगळवारी यवतमाळात स्विकारण्यात आले. यावेळी जिल्हयातील जवळपास शंभर पेक्षाही अधिक उमेदवारांनी आपले अर्ज निरीक्षकांकडे दाखल केले. यवतमाळ शहरातून पंधरा जणांनी तर आर्णी मतदार संघातून तब्बल 24 इच्छुकांनी उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे.
केंद्रात मोदी सरकार सत्तारूढ झाल्याने सर्वत्र मोदी लाट पसरली असून, ती अजूनही ओसरली नसल्याचे आजच्या मेळाव्यात दिसून आले. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी तसेच माजी आमदार र्शीकांत जोशी हे मंगळवारी शहरात दाखल झाले. त्यांनी भाजपाला महायुतीत सुटलेले यवतमाळ, राळेगाव, आर्णी, उमरखेड तसेच शिवसेनेच्या ताब्यातील दिग्रस, वणी, पुसद येथील इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्विकारले तसेच मतदार संघातील समस्यांची माहिती जाणून घेतली.

1 यवतमाळात गर्दी
जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या यवतमाळ विधानसभा मतदार संघासाठी इच्छुक उमेदवारांनी चांगलीच गर्दी केली. येथून माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, माजी आमदार मदन येरावार, बाबासाहेब गाडे, राजु पडगिलवार, मनोज इंगोले, अमोल ढोणे, जयदीप सानप, अजय राऊत, वासुदेव महल्ले, दिलीप मादेशवार, डॉ.वीणा खान यांच्यासह पंधरा जणांनी अर्ज सादर केले. लवकरच उमेदवारांची चाचपणी करणारी समिती येणार असून, कुणाची बाजू भक्कम,कोण सक्षम यासंबंधीचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार आहे.

शेतकर्‍यांच्या फायद्याचा होईल विचार
शेतकर्‍यांसाठी आम्ही काही घोषणा केल्या हे निश्चित असले तरी हे सर्व करण्यासाठी काही अवधी लागेल. 60 वर्षांतील चुकीची धोरणे सुधारणे 60 दिवसांत शक्य नाही. आम्हाला वेळ दिल्यास शेतकर्‍यांच्या भल्यासाठी केंद्र सरकार नक्कीच चांगले निर्णय घेईल, असा विश्वास भंडारी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. यावेळी राजाभाऊ ठाकरे, र्शीकांत जोशी, रामदास आंबटकर, मदन येरावार, बाबासाहेब गाडे आदी उपस्थित होते.

उमरखेड येथेही उमेदवारांची गर्दी
उमरखेड या मतदार संघासाठी मंगळवारी 15 इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले. यामध्ये राजेंद्र नजरधणे, डॉ. विणकरे यांच्यासह अन्य इच्छुकांचा समावेश असल्याची माहिती आहे. भाजपाच्या नेत्यांनी अर्ज सादर करणार्‍यांची नावे मात्र जाहीर केली नाहीत.

जाहिरातीचे मुद्देच प्रचाराचे मुद्दे
राज्यातील आघाडी सरकार सरकारी पैशातून स्वत:ची जाहिरात करण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्यात शेतकर्‍यांची अवस्था बिकट असताना, दरड कोसळून अनेक जण मृत्यूमुखी पडले असताना त्यांना मदत करण्याचे सोडून जाहिरातींवर पैसे उधळला जात आहे. मात्र, त्यांच्याकडून जाहिरातीसाठी देण्यात येणारे मुद्देच आम्हाला प्रचारासाठी महत्त्वाचे ठरतील, असे सांगून माधव भंडारी यांनी विविध योजनांची माहिती खरी की खोटी हे स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. ते यवतमाळात भाजपच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

समन्वयातून जागा वाटप
4राज्यात जागा वाटपाचा प्रश्न लवकरच समन्वयातून निकाली निघेल. इच्छुक उमेदवारांची वाढलेली ही गर्दी आमच्या विजयाचे द्योतक ठरेल. राज्यात समाधानकारक नव्हे तर दणदणीत विजय आम्ही संपादन करु . येत्या नऊ आगस्टला नवी दिल्ली येथे पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. माधव भंडारी, प्रदेश प्रवक्ते, भाजप.
एकाच मतदारसंघातून तीन भावांचे अर्ज दाखल
पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या आर्णी मतदार संघात तर इच्छुक उमेदवारांची रांग लागली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला येथे कमी मतदार झाल्याने इच्छुकांची येथे मोठी गर्दी झाली आहे. माजी आमदार संदीप धुर्वे, त्यांचे बंधू मिलींद धुर्वे, आणि तिसरे बंधू प्रमोद धुर्वे या तिघांनी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय याच मतदार संघातून तिन वेळा निवडणूक लढणारे उद्धवराव येरमेसुद्धा पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत.
राज्य सरकारला करणार ‘टार्गेट’
राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला काही विशिष्ट मुद्दयावर घेरण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केला आहे. गलथान कारभार, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, बंद पडलेले उद्योग आदी ज्वलंत मुद्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत भंडारी यांनी दिले.
राळेगावात तटबंदी
प्रा.वसंत पुरके यांच्या राळेगाव मतदार संघात प्रा.अशोक उईके यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. येथे फक्त चार अर्ज आले असून, जवळपास उईके यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी मतदार संघ पिंजून काढला आहे.लोकसभा निवडणुकीतसुद्धा या मतदार संघातून शिवसेनेला चांगले मताधिक्य मिळाल्याने दोन्ही प्राध्यापकांत काट्याची टक्कर होऊ शकते.