आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाअभियान: सांस्कृतिक सभागृहासाठी आता पालकमंत्र्यांना साकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अकोलेकर कलावंत, रसिकांना अद्ययावत सांस्कृतिक सभागृह मिळावे म्हणून सुरू असलेल्या लढ्यात राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानास रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, शेकडो रसिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना देऊन सांस्कृतिक सभागृहाचा प्रश्न रेटण्यासाठी नाट्य परिषदेच्या मलकापूर-अकोला शाखेच्या पदाधिकारी, सदस्यांनी कंबर कसली आहे.
कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून गेल्या काही दशकांपासून अकोलेकर कलावंत झगडत आहेत. त्याकरिता वेळोवेळी संबंधिताना निवेदन देऊन मागणी करण्यात आली. एवढेच नव्हे, तर सर्व कलावंतांनी एका व्यासपीठावर येत कृती समितीचेही गठण केले. मात्र, कधी निधी तर कधी जागा, अशा कारणांमुळे हा प्रश्न रखडला. मात्र, आता या लढ्याला चांगली गती मिळाली असून, टप्प्याटप्प्याने अद्ययावत सांस्कृतिक सभागृहाचा प्रश्न रेटला जात आहे.

शहरातील युवा कलावंतांनी महापालिका आयुक्त, उपायुक्त, विरोधी पक्षनेते आदींना निवेदन देऊन आपली समस्या मांडली. त्यानंतर जागतिक रंगभूमी दिनाला, तर बाल कलावंतांनी सांस्कृतिक सभागृहाअभावी महापालिकेच्या आवारातच नाटकाचा प्रयोग सादर करत या प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मलकापूर-अकोला शाखेतर्फे आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमात सभागृहासाठी आवाजी ठरावासह स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. त्याला उपस्थित रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. स्वाक्षरी अभियानातून ४५० पेक्षा अधिक रसिकांनी स्वाक्षरी करून ‘आम्हाला सभागृह हवेच’, असा आग्रह धरला. आता रसिकांनी स्वाक्षरी केलेल्या निवेदनासह रंगकर्मी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना साकडे घालणार आहेत. त्यासाठी नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन नारे, अशोक ढेरे, प्रा. सचिन बुरघाटे, नीरज आवंडेकर, प्रा. ममता इंगोले, कपिल रावदेव आदींसह सदस्य, रसिक पुढाकार घेत आहेत.
पथनाट्यातून करणार जनजागृती
अकोल्यातीलरसिक चोखंदळ असून कलावंतांची खाण आहे. मात्र दुर्देवाने अद्ययावत सभागृह नसल्याने सादरीकरणास व्यासपिठ उपलब्ध होत नाही. सभागृह हा केवळ कलावंतांशी निगडीत प्रश्न नसून सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. त्याविषयी सिद्धी गणेश प्रोडक्शन अकोलाचे कलावंत येत्या महिन्यात शहरात चौकाचौकांमध्ये पथनाट्यातून प्रबोधन करणार आहे. ‘सभागृह मिळेल का सभागृह...’ असा टाहो करीत नाट्य कलावंत या प्रश्नाकडे अकोलेकरांसह लोकप्रतिनिधी, रसिकांचे लक्ष वेधणार आहेत, अशी माहिती सचिन गिरी यांनी दिली.
सभागृहासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा
अकोल्यातील सांस्कृतिक सभागृहासाठी प्रत्येक कलावंत आपल्यापरीने प्रयत्नरत आहेत. मात्र, आता या लढ्याला गती आली असून, हा प्रश्न तातडीने निकाली लागण्यासाठी नाट्य परिषदेमार्फत प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येईल. जिल्ह्याचे पालकमंत्री यांना साकडे घालून त्यांच्या पुढाकारातून हा प्रश्न निश्चित मार्गी लागेल.''
डॉ.गजानन नारे, कार्याध्यक्ष, अ. भा. मराठी नाट्य परिषद, मलकापूर-अकोला शाखा.
बातम्या आणखी आहेत...