आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यातील चार नगरसेवकांच्या हद्दपारीचा प्रस्ताव सादर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- ‘पार्टी विथ डिफरन्स’चा टेंभा मिरवणार्‍या भाजपच्या तीनसह एकूण चार नगरसेवकांच्या हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाने (एसडीपीओ) उपविभागीय दंडाधिकार्‍यांना (एसडीएम) सादर केला आहे. या नगरसेवकांची हद्दपारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांना दिले होते.

सर्वपक्षीय नगरसेवक, मनपा प्रशासनामुळे विकासाचा बट्टय़ाबोळ झाला आहे. मनपाच्या सभांमध्ये विकासाचे निर्णय घेण्याऐवजी सत्ताधिकारी, विरोधक राजकारण करण्यातच मग्न असतात. कुरघोडीच्या राजकारणाचे पडसाद रस्त्यावरही उमटतात. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. वेळोवेळी केलेल्या आंदोनलामुळे विरोधी नगरसेवकांविरुद्ध गुन्हेही दाखल होतात.

दरम्यान, पोलिसांनी दखलपात्र, अदखलपात्र गुन्हे दाखल असलेल्या चार नगरसेवकांविरुद्ध दीड महिन्यापूर्वी हद्दपारीची कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या. भाजपचे नगरसेवक अजय रमेशचंद्र शर्मा, राजेश्वरी जगदीश शर्मा, सुरेश अंधारे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक फजउर्र रहेमान यांची अकोला उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाने (एसडीपीओ) हद्दपारीच्या अनुषंगाने चौकशी केली. एसडीपीओ कार्यालयाने हा सकारात्मक चौकशी अहवाल उपविभागीय दंडाधिकार्‍यांकडे सादर केला आहे. दरम्यान, जनहितासाठी केलेल्या आंदोलनांमुळे पोलिसांनी आकसापोटी गुन्हे दाखल केले असून, हद्दपारीच्या प्रस्तावाविरोधात कायदेशीर लढा देऊ, असा निर्धार या चारही नगरसेवकांनी बोलून दाखवला आहे.

असे आहेत गुन्हे दाखल..
* राजेश्वरी शर्मा : धमकी देऊन लोकसेवकाला कर्तव्यापासून परावृत्त करणे, बेकायदेशीर जमावाचा घटक होणे, कट कारस्थान रचणे, दंगा करणे.
* सुरेश अंधारे : लोकसेवकाला कामापासून अटकाव करणे, ठकवणूक करणे, बनावट दस्तावेज तयार करणे, बनावट दस्तावेज खरा म्हणून वापरणे.
* अजय शर्मा : शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, नुकसान करणे.
* मो. फजउर्र रहेमान : दरोडा, जबरी चोरी करताना प्राणघातक हत्याराचा वापर करणे, प्राणघातक हल्ला करणे, दंगा करणे.

प्रस्ताव मिळाला
नगरसेवकांच्या हद्दपारीचा सकारात्मक प्रस्ताव मिळाला आहे. नगरसेवकांना बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात येणार आहे. सुनावणीत दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करू.
- सोहम वायाळ, उपविभागीय महसूल अधिकारी, अकोला.

अशी होईल कार्यवाही
एसडीपीओ कार्यालयाच्या प्रस्तावाची एसडीएमकडे सुनावणी होणार आहे. एसडीएम कार्यालयाकडून संबंधित नगरसेवकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात येईल. उपलब्ध पुरावे, नगरसेवकांच्या युक्तिवादानंतर एसडीएम हद्दपारीबाबत निर्णय देतील.