आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोड्याच्या प्रयत्नात असलेली सशस्त्र टोळी अकोला शहरात जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - दरोड्याच्या तयारीत असलेल्या सशस्त्र टोळीला जेरबंद करण्यात रामदासपेठ पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलिसांनी 12 नाव्हेंबरला रात्री 3 वाजता केली. टोळीतील पाच जणांची 18 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जिल्ह्यात चोरी, घरफोडीचे गुन्हे वाढत असतानाच रामदासपेठ पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहे.

रात्री गस्तीवर असलेल्या रामदासपेठ पोलिसांना तापडियानगर परिसरात गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या टोळीची माहिती मिळाली. पोलिसांनी कोरडे हॉस्पिटल ते भारत विद्यालयाच्या मार्गावर सापळा रचला. या ठिकाणी पोलिसांनी आतिष विजय इंगळे (वय 19, रा. भीमनगर), सोनू काशीराम जाधव (वय 26, रा. जयहिंद चौक), संतोष उर्फ भद्या प्रभाकर वानखडे (वय 30, रा. भीमनगर), अनिकेत हरिभाऊ गेडाम (वय 22, रा. तापडियानगर), विनोद सुरेश धुमाळे (वय 29, रा. लहान उमरी) यांना अटक केली. ही कारवाई ठाणेदार विलास पाटील, उपनिरीक्षक आर. आर. खराटे, खोटेवार, हेडकॉन्स्टेबल सुरेश वाघ, गणेश पांडे, संजय भारसाकळ, आशीष ठाकूर, सुनील टोपकर, नरेंद्र चर्‍हाटे यांनी केली.

तिघे रामटेकेंवरील गोळीबारातील आरोपी
रामदासपेठ पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या पाचपैकी तीन आरोपी सोनू जाधव, संतोष उर्फ भद्या वानखडे आणि विनोद धुमाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजय रामटेके यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यातील आरोपी आहेत. रामटेके यांच्यावर 28 मे 2012ला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गोळीबार केला होता. सुदैवाने ते बचावले होते. यातील आरोपी वानखडे एक महिन्यापूर्वीच जामिनावर सुटला होता.

नजर युक्तिवादावर
रामदासपेठ पोलिसांनी दरोड्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील अटक केलेल्या आरोपींना दुपारी न्यायालयात हजर केले. ठाणेदार विलास पाटील यांनी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. आरोपींनी शस्त्र कोठून, कोणाकडून खरेदी केले, त्याचे कोणते गुन्हे करण्याचे नियोजन होते, याचा तपास करण्यासाठी आरोपींची पोलिस कोठडी आवश्यक आहे. आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असल्याचेही ठाणेदार पाटील यांनी सांगितले.

आरोपींचा होता काटा काढण्याचा डाव
रामदासपेठ पोलिसांनी दरोड्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील अटक केलेल्या आरोपींपैकी तिघांनी एका युवकाचा काटा काढण्याचा डाव आखला होता. हा युवक एका गंभीर गुन्ह्यात या आरोपींसोबत होता तसेच इतर आरोपींनी मात्र संपत्तीचा गुन्हा करण्याचा विचार केला होता. मात्र, पोलिस सर्वच बाजूने तपास करत आहेत.