आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आश्वासनामध्ये अडकली निवासस्थाने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - घरावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी सर्वस्व अर्पण करणार्‍या स्वातंत्र्य सैनिकांच्या निवासस्थानाचा प्रश्न दप्तर दिरंगाईत अडकला आहे. गेल्या पाच वर्षांपासून आश्वासनांव्यतिरिक्त ठोस कारवाई या प्रकरणावर जिल्हा प्रशासनाकडून झाली नाही. 2008 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी र्शीकर परदेशी यांनी स्वातंत्र्य सैनिकांसाठी निवासस्थाने बांधावी, असा निर्णय घेतला होता. तत्कालीन पालकमंत्री वसंतराव पुरके यांनी त्याला मान्यता दिली होती. रामदासपेठेतील महसूल विभागाच्या खुल्या जागेत स्वातंत्र्य सैनिकांची निवासस्थाने असावीत यावर शिक्कामोर्तबही झाले. कामकाजाची फाईलही तयार झाली. मान्यतेकरिता हा प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे पाठवला. त्याला पाच वर्षांचा कालावधी उलटला तरी ही फाईल दप्तर दिरंगाईत अडकली आहे.

दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेमध्ये प्रस्तावाची फाईल धूळखात पडली आहे. स्वातंत्र्य सैनिकांना दिलेले आश्वासन आणि तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्या निर्णयाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न केवळ आश्वासनातच विरला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

माजी सैनिक असो वा मृत सैनिकाचे नातेवाईक यांच्याकरिता शासनाचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालय काम करते. सेवा सुविधा वेळेवर मिळत नसल्यामुळे लाभार्थींना कार्यालयाच्या फेर्‍या माराव्या लागतात. आठ ऑगस्टला जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयात फेरफटका मारला असता जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जी. ब. बोरकर व सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अनुपस्थित आढळून आले. दोन्हीही प्रमुख अधिकारी कार्यालयात अनुपस्थित राहणे हे कितपत योग्य आहे, असा प्र्श यादिवशी आपल्या विविध कामाकरिता जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयात आलेल्या माजी सैनिकांनी व पाल्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यक्त केला.

500 रुपयांत मिळते ओळखपत्र
प्राणाची आहुती देणार्‍या सैनिकांच्या कुटुंबीयांना तसेच माजी सैनिकांना जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत ओळखपत्र दिले जाते. बरेच माजी सैनिकांचे ओळखपत्र जुने असल्याने त्यावरील मजकूर अस्पष्ट दिसतो. त्यामुळे ते आपल्या ओळखपत्राच्या नूतनीकरणासाठी या कार्यालयात येतात. मात्र, या ओळखपत्रासाठी त्यांना 500 रुपये मोजावे लागतात. कोणत्याही ओळखपत्रासाठी 10 ते 20 रुपये नाममात्र शुल्क असताना त्यांच्याकडून 500 रुपये घेणे कितपत योग्य आहे, ही विचारार्थ बाब आहे.