आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातील कचऱ्यातून केली गांडूळ खताची निर्मिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- घरात निघणारा कचरा, झाडांची पाने आणि शेण हे घराच्या बाहेर कचरा पेटीत फेकून देण्यापेक्षा त्यावर थोडीशी मेहनत घेऊन प्रक्रिया केली, तर घरच्या घरी सर्वोत्तम दर्जाचे शेणखत, गांडूळ खत तयार करता येते. बोलायला सोपे वाटते तसेच करायलादेखील सोपे आहे, हे सिद्ध करून दाखवले आहे एकाहत्तर वर्षांचे रामदास खंडागळे यांनी. महावितरण विभागाचे माजी मुख्य अभियंता म्हणून ते २००३ साली निवृत्त झाले. त्यानंतर घरी रिकामे बसण्यापेक्षा त्यांनी घरातील अनेक टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून प्रयोग करायला सुरुवात केली. आज ते गांडूळ खत, शिकेकाई आणि काही आयुर्वेदिक औषधी घरी तयार करून, त्यातून अर्थार्जनदेखील करत आहे.
मागील तीन वर्षांपासून त्यांनी गांडूळ खत घरच्या गच्चीवर तयार करायला सुरुवात केली. जुने झालेले फ्लेक्सचा गच्चीवर बेड तयार केला. त्यात झाडांची पाने, शेण टाकून त्यावर रोज पाणी शिंपडणे, असे काम सुरू केले. जवळपास एक महिन्यानंतर त्यात काही गांडूळ सोडले, तर त्याचे उत्तम खत तयार झाले. हे खत ते स्वत: बगिच्यात झाडांना वापरतात. घरी अत्यंत साध्या पद्धतीने खत तयार करून त्यातून ते महिन्याला दोन हजार रुपये कमवतात.
कचऱ्यातून घरी तयार केले ...
शिवाय घरी सेंद्रिय भाज्यांचा, फळ यांचा आस्वाद घेतात. ते टेरेस गार्डनमध्ये ते सर्व प्रकारचे भाज्या घेतात. आज ते त्यांच्या घरी मिरची, भेंडी, लसूण, वांगे, आंबडचुका, पालक, अशा विविध भाज्या घेतात. यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च त्यांनी केला नाही. घरातील वेस्ट झालेले प्लास्टिकचे डब्बे, टब यांचा कुंड्या म्हणून वापर केला. एवढेच काय, तर त्यांनी घरी कापडी कुंड्यादेखील तयार केल्या. घरातील जुने जीन्स पॅन्टच्या कुंड्या शिवल्या आणि या कापडी कुंड्यामध्ये गाजर, वांगे याचे उत्पादन घेतले.
घरातील प्रत्येक वेस्ट वस्तूचा ते पुरेपूर वापर करतात. त्यांनी घरीच छोटासा शिकेकाई, आवडा पावडर मेकिंगचा व्यवसाय सुरू केला. घरी वापरून झालेले निंबाचे साल, संत्र्याचे साल ते फेकून देत नाही, तर ते सुकवून शिकेकाईमध्ये वापरतात. ते घरातील प्रत्येक लहान सहान गोष्टींचा, कचऱ्याचा पुरेपूर वापर करून घेतात. त्यामुळे त्यांच्या घरातून कचरा बाहेर जाणे बंद झाले. महिन्यातून एक किंवा दोन वेळा ते थोडाफार कचरा घंटागाडीवाल्याकडे देतात. त्यांना त्यांच्या या प्रयोगात त्यांचे पूर्ण कुटुंब सहकार्य करते. मुलगा नितीन खंडागळे, सून मीनाक्षी खंडागळे आणि छोटीशी नात हीदेखील त्यांच्या या प्रयोगांना प्रोत्साहन देतात. त्यांच्या या सर्व प्रयोगांमुळे त्यांचे घर हे पर्यावरण मित्र म्हणून ओळखले जाते.
निसर्गप्रेमी खंडागळे यांचे संपूर्ण घर हे चहूबाजूंनी झाडांनी वेढलेले आहे. कुंपणाच्या बाहेर पपई, नारळ, आणि काही शोभिवंत झाडे लावलेले आहेत. अंगणात समोरच्या बाजूने शुद्ध हवेसाठी तुळस आहे. गावरान गुलाबाच्या फुलांच्या काही प्रजाती आहेत. आयुर्वेदिक महत्त्व असणाऱ्या पांढरी गुंज या वेलाच्या पानांना सुकवून त्याची पावडर ते देतात. तसेच जांभुळाच्या बियांची पावडर मधुमेहींना देतात.
पर्यावरण मित्र पुरस्कार
या जागतिक पर्यावरण दिनाला त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून शिवाजी महाविद्यालयाने त्यांना पर्यावरण मित्र पुरस्कार देऊन सन्मानित केले. व्यवसायाने अभियंता असले, तरी आज त्यांचे घर एखाद्या कृषी तज्ज्ञप्रमाणे झाडांनी सजलेले आहे. प्रत्येक झाडाचे महत्त्व, त्याचा वापर याबाबत ते मार्गदर्शन करतात.