आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवासाठी राजराजेश्वर नगरी सज्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सर्वांच्या लाडक्या बाप्पांचे आगमन आज होणार असून, बाप्पांच्या स्वागतासाठी राजराजेश्वर नगरी सज्ज झाली आहे. शहरातील सर्वच सार्वजनिक मंडळांनी बाप्पांच्या स्वागताची विशेष तयारी केली आहे, तर घरगुती गणेशोत्सवासाठी नागरिकांची बाजारपेठेत लगबग
दिसून येत आहे.
आकर्षक देखाव्यांच्या सादरीकरणासाठी मागील वर्षींच्या तुलनेत बजेट वाढवला असून, १ लाख रुपयांच्या वर देखाव्यांच्या सादरीकरणाचा खर्च गणेशोत्सव मंडळांनी केला आहे. नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता मनपा प्रशासनाच्या वतीने श्रींच्या मूर्ती विक्रीची व्यवस्था क्रिकेट क्लब मैदान व भारत विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीसोबतच मातीच्या मूर्ती बाजारपेठेत विक्रीस आल्या आहेत. एकंदरीत गुलालाच्या उधळणीत व ढोल-ताशांच्या गजरात श्रींच्या स्वागतासाठी राजराजेश्वर नगरी सज्ज झाली आहे.
येथे मिळणार मातीचे गणपती : रतनलाल प्लॉट चौकामध्ये निसर्ग कट्टाच्या वतीने मातीच्या मूर्तीची विक्री करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त जुने शहरातील जय हिंद चौक, क्रिकेट क्लब मैदान, जठारपेठ चौक आदी ठिकाणी मातीपासून निर्मित गणेश मूर्तीची विक्री होत आहे.

अशी करावी प्राणप्रतिष्ठा : वैदिक व पौराणिक पद्धतीनुसार गणेशाची स्थापना केली जाते. घरी पूजा करताना प्रथम कलश मांडून त्याची पूजा करावी. त्यानंतर भगवान गणेशाचे मनोभावे आवाहन करावे.
आज गणेश चतुर्थी असल्याने पूर्ण दिवस उपासनेसाठी उत्तम आहे. एरव्ही चतुर्थीला चंद्राचे दर्शन करणे शुभ मानले जाते. मात्र, गणेश चतुर्थीला चंद्राचे दर्शन अशुभ मानले जाते. आज, रात्री ८.५५ वाजेपर्यंत चंद्रदर्शन होणार आहे. त्यामुळे हा काळ टाळावा, अशी माहिती मोहन शास्त्री जलतारे यांनी दिली.
मातीच्या मूर्तीला भाविकांचा प्रतिसाद
१० मंडळांना वीजजोडणी : १० दिवसांच्या वीजजोडणीसाठी अर्ज करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना वीजजोडणी देण्यात आली आहे, तर ज्या मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेतली नाही, अशा मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे.
१७० मंडळे नोंदणीकृत : गणेशोत्सवासाठी मंडळ स्थापने महत्त्वाचे आहे. अकोला शहरातील १७० मंडळांनी धर्मदाय आयुक्तांकडे गणेशोत्सव मंडळांची नोंदणी करण्ययात आली आहे.
हा आहे शुभ मुहूर्त : गणेशाची स्थापना करण्यासाठी तसा पूर्ण दिवस शुभ आहे. त्यातही सकाळी ६ वाजून सात मिनिटांपासून दुपारी १२ वाजून २२ मिनिटांपर्यंतचा काळ सर्वोत्कृष्ट आहे. दुपारी १२ वाजून २२ मिनिटांपासून दुपारी ४ वाजून २७ मिनिटांपर्यंतचा काळ उत्तम तर दुपारी ४ वाजून २७ मिनिटांपासून सायंकाळी ६ वाजून ३८ मिनिटांपर्यंत साधारण मुहूर्त आहे.