आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ‘श्री’च्या आगमनासाठी शहर सजले आहे. अनेक मंडळांनी केलेल्या विद्युत रोषणाईने रविवारी रात्रीच शहर उजळून निघाले होते. तर, घराघरात गणरायाच्या स्वागतालाही वेग आला आहे. अनेक मंडळांनी तसेच नागरिकांनी रविवारीच गणरायाला वाजत-गाजत घरी नेले.

पालिकेतर्फेही शहरातील रस्त्यांची डागडुजी करत रस्त्यांची स्वच्छता केली आहे. लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी आबालवृद्धही प्रतीक्षेत असून, रविवारी हरितालिका उत्सवाच्या दिवशी अनेकांनी बाप्पांची मूर्ती घरी नेली. सोमवारी घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गजाननाची स्थापना होणार आहे. शहरातील वातावरण भक्तिमय झाले असून, सर्व साक्षी गणरायाच्या आगमनाची नांदी झाली आहे. शहरातील अशोक वाटिका, सवरेपचार रुग्णालय, जिल्हा कारागृह, जयहिंद चौक, गुलजारपुरा, जठारपेठ, वसंत देसाई क्रीडांगण परिसरात आज तसेच सोमवारी दिवसभर गणेशमुर्ती खरेदीची धुम राहणार आहे. गणेश स्थापनेपुर्वी त्याच्या आगमनाच्या तयारीला अंतीम रुप देण्यात गणेशभक्त रविवारी व्यस्त होते. बाप्पांचा मंडप, विद्युत रोषणाई, ढोलताशे, गुलाल, पुजा साहित्य आदींची जुळवाजुळव सुरू होती. पोलिस प्रशासनेही बाप्पांच्या आगमनासाठी बंदोबस्तात वाढ केली आहे. रविवारी शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून आली. अनेक अबालवृद्धांनी गणरायाच्या स्वागतासाठी रांगोळी तसेच मखरसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. सोमवारी दुपारपर्यंतच गणरायाच्या प्राणप्रतिष्ठापणा करण्याचा मुहूर्त असल्याने अनेकांनी रविवारी रात्रीच गणरायाला घरी नेले. सकाळी चांगला मुहूर्त असल्याची माहिती पुजार्‍यांनी दिली.

फुलांनी सजला बाजार
गणेशाचे स्वागत करण्यासाठी शहरात उत्साहाला उधाण आले आहे. वाढती महागाई आणि इंधनच्या दरात वाढ झाल्याने मागील काही दिवसांपासून फुलांच्या किमतींमध्येही मोठी वाढ झाली होती. यामुळे फुल विक्रेते हैराण झाले होते. रविवारी मात्र, फुल बाजाराचे चित्र वेगळे होते. गजाननाचे स्वागत करण्यासाठी बाजारात गर्दी होती.

‘दिव्य मराठी’ गणेशोत्सव स्पर्धा
दैनिक दिव्य मराठीतर्फे 10 ते 18 सप्टेंबर या कालावधीत ‘माझा बाप्पा सर्वात चांगला’ या गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा केवळ घरी श्री गणेशाची स्थापन करून सजावट केलेल्यांसाठी आहे. उत्कृष्ट सजावट असलेल्या गणरायांची दररोज निवड करण्यात येईल. त्यातीलच उत्कृष्ट सजावट असणार्‍या छायाचित्रांना ‘दिव्य मराठी’मध्ये प्रकाशित करून निवडण्यात आलेल्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक दैनिक दिव्य मराठी कार्यालय, सिव्हिल लाइन, बॅँक ऑफ बडोदाजवळ, अमानखाँ प्लॉट, अकोला या पत्त्यावर किंवा vitthal.kakade@dainikbhaskargroup.com या ई-मेलवर फोटो पाठवावेत.