आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार करून चिमुकलीची हत्या करणा-या नराधमास केली अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: अखेर पोलिसांनी आरोपीस पकडले.
अकोला - चार महिन्यांपूर्वी मानलेल्या बहिणीच्या तीन वर्षांच्या मुलीला आपल्या घरी घेऊन जाण्याच्या बहाण्याने तथाकथित मामाने त्या चिमुकलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केला होता. ही घटना अमरावतीपासून काही अंतरावर असलेल्या उत्तमसरा शेत शिवारात घडली होती. तेव्हापासून फरार असलेल्या आरोपीला गुरुवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास अकोला रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी अकोला रेल्वेस्थानकावर पकडले. घनश्याम एकनाथ वाडेकर (वय ३५) असे आरोपीचे नाव असून, तो अमरावती जिल्ह्यातील काटा आमला येथील रहिवासी आहे.

१९ नोव्हेंबर २०१४ रोजी घनश्याम वाडेकर हा उत्तमसरा येथे गेला. माझ्या घरी घेऊन जातो म्हणून तो मुलीला घेऊन गेला. तीन दिवसांनंतर काटा आमला येथील ओळखीचे काही जण उत्तमसरा येथे आले असता, माझी मुलगी कशी आहे, म्हणून विचारले. मात्र, तुझी मुलगी तर आलीच नाही, असे त्यांनी सांगितल्यानंतर आईच्या पायाखालची वाळूच सरकली. तिने बडनेरा शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि ३७३, ३६६ अन्वये घनश्याम वाडेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, दोन दिवसांनी त्या मुलीचा मृतदेह काटा आमला शिवारात आढळून आला. पोलिसांनी मुलीचे शवविच्छेदन केल्यानंतर मुलीवर बलात्कार तिची गळा दाबून हत्या झाल्याचे समोर आले. पोलिसांनी कलमामध्ये वाढ करून भादंवि ३७६, ३०२, पॉस्को ६,८,१२ लावले. तेव्हापासून पोलिस आरोपीचा शोध घेत होते. मात्र, गुरुवारी दुपारी १२.३० वाजता नागपूर - भुसावळ पॅसेंजर गाडी रेल्वे फलाटावर थांबली. या गाडीमध्ये बसलेल्या दोन युवकांना आरोपी रेल्वेस्थानकाच्या फलाटावरील बडनेराकडे जाणा-या दिशेने झाडाच्या आड उभा असलेला दिसून आला. कर्तव्यावर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाचे जवान हेडकॉन्स्टेबल मुकुंद जगताप यांनी जवान पंकज पागृत, संजय बोरुले यांच्या मदतीने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहून आरोपी पळायला लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडले.
अखेर पोलिसांनी आरोपीस पकडले.

रेल्वे पोलिसांची सतर्कता
रेल्वेपोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपीला पाच मिनिटांच्या आत पीएसआय आशू शर्मा यांच्या नेतृत्वात अटक करण्यात आली. सुरुवातीला आरोपीने खोटे नाव सांगितले. मात्र, त्यास खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि आपणच घनश्याम वाडेकर असल्याची कबुली त्याने दिली.

आरोपी ताब्यात
आरोपीहा गेल्या चार महिन्यांपासून बडनेरा पोलिसांच्या रडारवर होता. तो आपली ठिकाणे बदलत होता. मात्र, दोन युवकांच्या सतर्कतेमुळे आरोपीला जेरबंद करण्यात आले. बडनेरा पोलिसांशी संपर्क साधून त्याला त्यांच्या स्वाधीन केले.'' राजेशबढे, पोलिस निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल