आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"कहो दिलसे, काँग्रेस फिरसे' म्हणत टाकला मनपात कचरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वात महापालिकेत कचरा आणून टाकला. शहरामध्ये कचर्‍याची समस्या निर्माण झाली असून, प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करत त्यांनी "कहो दिलसे, काँग्रेस फिरसे'च्या घोषणा देत बुधवारी दुपारी महापौर आयुक्त यांच्या दालनासमोर कचरा टाकला.

प्रत्येक सभांमध्ये आम्ही कचर्‍याची समस्या प्रशासन महापौरांना सांगूनही सुटली नाही. उलट दिवसेंदिवस कचर्‍यामुळे शहर दुर्गंधीयुक्त होत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला. शहर कचरामुक्त करण्याची मागणी करत त्यांनी "कहाँ है अच्छे दिन' म्हणत, काँग्रेसचा जयघोष करत आंदोलन केले. या वेळी महापौर आयुक्त यांच्या दालनासमोर कचरा टाकून सत्ताधार्‍यांचा, मनपा प्रशासनाचा तीव्र निषेध केला. साजिद खान पठाण म्हणाले की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानासुद्धा अकोला महानगरामध्ये सर्व प्रभागात साफसफाई घनकचरा व्यवस्थापन होत नाही. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच विविध आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.

नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याची नैतिक जबाबदारी सत्ताधारी भाजपची असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाची कोणतीही दखल अकोला मनपातील अधिकारी सत्ताधारी घेत नसून, "अच्छे दिन आनेवाले है', असा नारा देऊन सत्ताधारी भाजपने शहरवासीयांची फसवणूक चालवली आहे. सत्ताधारी शहरवासीयांना दैनंदिन मूलभूत सुविधा पुरवण्याबाबत अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. शहरात दैनंदिन साफसफाई व्यवस्था राबवून शहर घनकचरामुक्त करणे आवश्यक असताना याबाबत कोणतेही नियोजन मनपा सत्ताधार्‍यांनी प्रशासनाने केले नाही, असे आरोप साजिद खान पठाण यांनी केला आहे. आंदोलनामध्ये काँग्रेसचे नगरसेवक दिलीप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुलचंदानी, शेख गंगाबेनीवाल आदी उपस्थित होते.

(फोटो : विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी बुधवारी महापालिकेत कचरा टाकला.)