आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीत शहरातील रस्त्यांवर कचरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- दिवाळीत निर्माण झालेला कचरा साफ करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. कचरा साफ करणारे कर्मचारी आज काही ठिकाणी कामावरच न आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली होती. शहरात त्वरित व्यापक प्रमाणात साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विरोधातील नगरसेवकांनी शहरातील मुख्य मार्गांवर स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज व्यक्त केली.

शहरातील मुख्य रस्ते असलेल्या गांधी मार्ग, टिळक मार्ग, जैन मंदिर, काश्मीर लॉज रोड, जठारपेठ चौक, जठारपेठ ते दुर्गा चौक रोड, राऊतवाडीतील बँक ऑफ महाराष्ट्र समोरील कचरा, अशोक वाटिका रोड, शहरातील जुने शहर भाजी बाजार, मुख्य बाजारपेठ, सिंधी कॅम्प बाजारपेठ, जठारपेठ भाजी बाजार या ठिकाणी शहरात कचरा साचल्याचे चित्र होते. शहरात आलेल्या पाहुण्यांनी या कचर्‍याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांना याची सवय झाल्याने त्यांची ओरड कमी होती. मात्र, बाहेर गावाहून आलेल्यांनी यासंबंधी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सुट्टीवर असल्याने हा कचरा उचलण्यात चालढकल होत आहे. शहरात दिवाळीच्या दिवशीही कचरा उचलण्यात आला. मात्र, अपुरी यंत्रणा असल्याने तो पूर्णत: उचलण्यात आरोग्य विभागाला अपयश आले.

अन्यथा, कंत्राट रद्द करू
दिवाळीत काही ठिकाणी कचरा साचल्याच्या तक्रारी मिळाल्या. प्रशासनाने कंत्राटदाराला कचरा साफ करण्याची सूचना दिली. दिवाळीत कचरा दिसणार नाही, अशी हमी कंत्राटदाराने दिली होती. मात्र, त्यानंतरही कचरा दिसत असेल, तर कंत्राट रद्द करावा लागेल. रफिक सिद्दीकी, उपमहापौर, महापालिका, अकोला.

दिवाळीत ही स्थिती नको
माझ्या प्रभागात मी स्वत: कचरा उचलण्याची सोय केली आहे. पण, शहरात अनेक ठिकाणी कचरा साचल्याचे चित्र आहे. दिवाळीत ही स्थिती नको होती, अशी अपेक्षा आहे. काही दिवसांत साफसफाई गतीने करण्याची गरज आहे. आशीष पवित्रकार, नगरसेवक, भाजप.

स्वच्छतेची गरज
शहरात स्वच्छतेची गरज आहे. शहरातील भाजीबाजार मुख्यत: स्वच्छ करावा, याबाबतच्या अनेक तक्रारी नागरिकांच्या आहेत. त्या ठिकाणी विशेष व्यवस्था करावी. पंकज गावंडे, नगरसेवक, शिवसेना, अकोला.

25 टन कचर्‍याची उचल
शहरात गेल्या दोन दिवसांत 25 टन कचर्‍याची उचल करण्यात आली. काही मुख्य रस्ते साफ करण्यात आले आहे. इतर महत्त्वाची रस्ते येत्या एक दोन दिवसांत साफ केले जातील. आज जवळपास 12 ते 15 टन कचरा उचलला गेला.