आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस सिलिंडरच्या अनुदानासाठी 'आधार कार्ड' सक्तीमुळे नागरिक संतप्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - केंद्र शासनाने घरगुती गॅस सिलिंडरच्या अनुदानासाठी आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, शहरासह जिल्ह्यातील अनेक ग्राहकांचे आधार कार्ड लिंक झाले नाही. अशातच 31 जानेवारी ही अखेरची मुदत आहे. यानंतर ग्राहकांना एक हजार 13 रुपये 50 पैशांना गॅस सिलिंडर घ्यावे लागणार आहे. दरम्यान आधार, बँक खात्याच्या सक्तीमुळे नागरिक संतप्त झाले आहे.
केंद्र शासनाने घरगुती वापराच्या सिलिंडरची भाववाढ जानेवारीत दोन वेळ केली आहे. आता ग्राहकांना एक हजार 13 रुपये 50 पैशांना गॅस सिलिंडर विकत घ्यावे लागणार आहे. एकीकडे होत असलेली गॅस सिलिंडरची भाववाढ आणि केंद्र शासनाने लावलेले अनुदानासाठीचे नियम व अटी या ग्राहकांना मनस्ताप देणार्‍या ठरत आहे.
यापूर्वी ग्राहकांना घरगुती गॅस सिलिंडर एक हजार 305 रुपयांना मिळत होते. याचे अनुदान संबंधित ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये 435 रुपये जमा व्हायचे, दरम्यान अद्यापही शहरासह जिल्ह्यातील हजारो गॅस सिलिंडर ग्राहकांचे आधार कार्ड बँक खात्यामध्ये लिंक करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. राज्य शासनाने याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. लोकप्रतिनिधींनी या समस्येची दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
भाववाढ नंतर अनुदान तेवढेच
केंद्र शासन घरगुती गॅस सिलिंडरची भाववाढ करत आहे. परंतु, गॅस सिलिंडरची भाववाढ होत असताना ग्राहकांना मिळणारे अनुदान तेवढेच आहे. केंद्र शासन नागरिकांवर आर्थिक भार टाकत आहे, असा आरोप होत आहे. घरगुती गॅस सिलिंडर 14.2 किलोचे आहे. यामध्ये ग्राहकांना काही सिलिंडर कमी प्रमाणात भरलेले देण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
लिंक कार्डधारकांना फायदा
ज्या गॅस सिलिंडर ग्राहकांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झालेले आहे. त्यांना अनुदानाचे 435 रुपये खात्यामध्ये जमा होत आहे. परंतु, ज्या ग्राहकांचे आधार कार्ड लिंक झाले नाही, त्यांना एक हजार 13 रुपये 50 पैशांना सिलिंडर विकत घ्यावे लागणार आहे. त्यांनी आधार कार्ड लिंक केल्यानंतर त्यांची रक्कमसुद्धा बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
ग्राहकांच्या अधिकारावर गदा
वजन काटा गरजेचा :
गॅस एजन्सीधारकांकडून ग्राहकांना मागणीनुसार घरपोच सिलिंडर देण्यात येते. परंतु, हे सिलिंडर देताना ग्राहकाला सिलिंडरचे वजन करून देणे आवश्यक आहे. मात्र, कोणत्याच कंपनीच्या एजन्सी संचालकांद्धारे ग्राहकाला सिलिंडरचे वजन करून देण्यात येत नाही. याकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.
ग्राहकांना त्रास :
गॅस कंपन्यांनी ग्राहकांच्या सोयीकरिता आईवीआरएस नावाचे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्याच्या माध्यमाने ग्राहक दूरध्वनीद्वारे सिलिंडरसाठी नोंदणी करू शकतात. हे अत्यंत सोयीचे असून, या सॉफ्टवेअरने ग्राहकांना नोंदणीचा प्रतीक्षा क्रमांकदेखील लगेच फोनवर मिळतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून याबाबतची सेवा विस्कळीत झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शासनाला माहिती देणार
नागरिकांना आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळावी, यासंदर्भात राज्य शासनाला व केंद्र शासनाला याची माहिती देण्यात येणार आहे.’’ अरुण शिंदे, जिल्हाधिकारी.
या तीन कंपन्यांकडून मिळते सेवा
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन - 71, 433
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन - 65, 748
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन - 1, 06, 102