आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सणासुदीत गॅस मिळत नसल्याने ग्राहकांत रोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शहरासह जिल्ह्यात ऐन सणासुदीच्या दिवसांत सिलिंडरची मोठय़ा प्रमाणात टंचाई भासत आहे. पैसे मोजूनही नागरिकांना सिलिंडरसाठी दिवसभर ताटकळत थांबावे लागत आहे. ऑनलाइन बुकिंगनंतरही नागरिकांना सिलिंडरसाठी वेटिंगवर राहावे लागत आहे. घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक कामासाठी वापर होत असल्याने हा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे.

शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसापांसून सिलिंडरची कृत्रिम टंचाई जाणवत आहे. ऑनलाइन बुकिंग प्रणाली सुरू झाल्यानंतरही सिलिंडरसाठी नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे. आपली कामे बाजूला ठेवून त्यांना संबंधित गॅसपुरवठा एजन्सीच्या कार्यालयासमोर दिवसभर ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे वास्तव आहे. मागील काही दिवसांपूर्वी शहरात सिलिंडरसाठी हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिस संरक्षणात गॅसपुरवठा एजन्सीना सिलिंडरची विक्री करावी लागत होती. अशा प्रकाराला संबंधित एजन्सीधारक दोषी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनुदानित सिलिंडरची किंमत 447 रुपये, तर विनाअनुदानित सिलिंडरची किंमत 920 रुपये आहे. याव्यतिरिक्त अधिक रक्कम घेऊन शहर व जिल्ह्यात सिलिंडरची अनधिकृतरीत्या विक्री होत असल्याचे प्रकारही सुरू आहेत. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत नागरिकांना विशेषत: महिलावर्गाला अधिक मनस्ताप करावा लागत आहे.

तांत्रिक अडचण
ज्या राज्यातून सिलिंडर येतात तिथे मशीन खराब झाल्यामुळे सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच पावसाळा व हिवाळ्यात सिलिंडरचा अधिक वापर होत असल्याने काही प्रमाणात तुटवडा भासत आहे. विजय चोपडे, संचालक, विजय गॅस एजन्सी, अकोला

सूचना देण्यात येतील
शहरात व जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा भासू नये यासाठी संबंधिताना सूचना देण्यात येतील. यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहे. अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी

शहरात बारा गॅस एजन्सी : अकोला शहरात ग्राहकांच्या सेवेसाठी बारा गॅस एजन्सी आहेत. यामध्ये इंडियन कार्पोरेशन कंपनीच्या तीन गॅस एजन्सी आहेत. या कंपनीचा प्रकल्प धनज येथे आहे. भारत पेट्रोलियम कंपनी तीन एजन्सी असून, प्रकल्प जळगाव येथे आहे. हिंदुस्थान कार्पोरेशन कंपनीच्या चार गॅस एजन्सी असून, निंभोरा येथे प्रकल्प आहे.

दसर्‍यात सिलिंडरसाठी दाणादाण रविवारी दसरा सण आल्याने सणासुदीलाही सिलिंडर मिळेल की नाही, या विवंचनेत महिला दिसत आहेत. गॅस एजन्सीच्या ढिसाळ कारभारामुळे ग्राहक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. त्यातच रॉकेल मिळणेही दुरापास्त झाल्याने नागरिक हतबल झाले आहेत.

शहरातील गॅस ग्राहकांची संख्या
2, 43, 504

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन : 71,433

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन : 65,748

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन : 1,06,102