आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन: जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार संपावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- तेल्हारा तालुक्यातील घोडेगाव येथील अवैध उत्खनन करताना तीन मजुरांचा त्यात दुर्देवी अंत झाला. याप्रकरणी पोलिस प्रशासनाने येथील तहसीलदार सचिन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेच्या निषेधात बुधवार 30 एप्रिल रोजी जिल्ह्यातील लोणार, चिखली, खामगाव, बुलडाणा, शेगाव आदी विविध तालुक्यांत महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन प्रारंभ केले आहे, तर बुलडाण्यातील महसूल विभागाचे हे अधिकारी बेमुदत संपावर गेले आहे. या आंदोलनामुळे जिल्हय़ातील महसूल विभाग ठप्प पडला आहे.

घोडेगाव येथे रेतीचे अवैध उत्खनन करताना नदीची दरड कोसळून तीन मजुरांचा मृत्यू झाला. ही घटना चोरी करताना घडलेली आहे, याच्याशी महसूल विभागाचा कोणताही दोष नाही. तरीही तेल्हार्‍याचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची चौकशी न करता गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या वतीने अन्यायकारक पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे या घटनेच्या निषेधात बुलडाण्यात काम बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आला. त्यामुळे गुन्हा नोंदवणार्‍या पोलिसांवर जोपर्यंत कारवाई होत नाही व शासन सचिन पाटील यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई खारीज करत नाही तोपर्यंत सर्व नायब तहसीलदार, तहसीलदार व उपजिल्हाधिकारी हे कामबंद आंदोलनात सहभागी राहतील, असा इशारा देण्यात आला आहे.

या वेळी आंदोलनात आरएन देवकर, एसपी कणसे, केबी सुरडकर, दीपक बाजड, इलियास खान, विजय पाटील, आरएस इंगळे आदी सहभागी होते. लोणार येथील महसूल कर्मचारी संघटना, राजपत्रित अधिकारी, महसूल संघटना, पटवारी संघटना, कोतवाल संघटना आदींनी लेखणी बंद आंदोलनात सहभाग नोंदवला, अशी माहिती नायब तहसीलदार एसपी भगत यांनी दिली.

चिखली । तहसिल कार्यालयात महसूल कर्मचार्‍यांच्यावतीने बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलनात तहसिलदार राजेश्वर हांडे, नायाब तहसिलदार पीएन पडघान, एनपी बराटे, विजय पाटील, शाम धनमने, मनोज दांडगे, बीएल पवार, सुनील ढवळे, नितीन बढे, शोभा गवई, योगिता जाधव, केशव सदार आदी उपस्थित होते.यावेळी नागरिकांची गैरसोय होऊन नये म्हणून कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवेदने स्विकारली.
शेगावात कामकाज विस्कळीत
शेगाव- येथे करण्यात आलेल्या आंदोलनात तहसीलदार डॉ. रामेश्वर पुरी, नायब तहसीलदार देशपांडे, मंडळ अधिकारी पद्माकर पाठक, राजाभाऊ काळे, ए. डी. कडुकार, महसूल कर्मचारी संघटनेचे सचिव पी. जे. पवार यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

वरिष्ठांचा सल्ला घ्यावयास हवा
राजपत्रित अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करताना वरिष्ठांचा सल्ला तसेच जिल्हाधिकार्‍यांचा सल्ला घेणे आवश्यक होते. महसूल अधिकार्‍यावर अशा प्रकारे गुन्हे दाखल झाल्यास प्रशासन चालवणे कठीण होईल.’’
-मनीष गायकवाड, तहसीलदार, लोणार