आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींनी करावी योगासने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मुली वयात येताना त्यांच्यात शारीरिक बदलांसह अनेक मानसिक बदलदेखील घडत असतात. या बदलांना समजून घेऊन, त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात मुलींमध्ये गर्भाशयाशी निगडित आजारांमध्ये वाढ होत आहे. योगासनांमुळे अनेक आजारांपासून मुक्ती होऊ शकते. मुलींनी पौष्टिक आहार सेवनासह नियमित योगासने करावे, असे प्रतिपादन नागपूर येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. उज्ज्वला देशमुख यांनी केले.
अकोला योग फोरमच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सुरू असलेल्या व्याख्यानमालेत २० जून रोजी प्रमिलाताई ओक हॉल येथे ‘कळी उमलताना’ या विषयातील विविध पैलू त्यांनी उलडगले. बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांप्रमाणेच नुकत्याच वयात आलेल्या मुलींमध्ये गर्भाशयाशी निगडित अनेक आजार उद््भवत आहेत. त्याबाबत १० ते १९ वर्षे वयोगटांतील मुली, पालक आणि शिक्षिकांना डॉ. उज्ज्वला देशमुख यांनी पॉवरपॉइंटद्वारे माहिती दिली. मुली, पालक, स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्यात खुला संवाद हवा. अनेक वेळा मासिक पाळीशी संबंधित विषयांवर चर्चा होत नाही आणि त्यामुळे गर्भाशयाच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. या काळातील शारीरिक स्वच्छता, चिडचिड, बदल याविषयी खुला संवाद आवश्यक आहे. तसेच मुलींनी रोज नियमित किमान अर्धा तास योगासन करणे गरजेचे आहे. एक आसन किमान सात मिनिटे केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
मुली, पालक, शिक्षक आणि डॉक्टर यांच्यात खुला संवाद असेल, तर याबाबत जनजागृती होण्यास मदत होईल, असे मत आयएमएचे अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल यांनी व्यक्त केले. डॉ. दिशा पंडित, कौस्तुभ नाईक यांनी योग गीत सादर केले. सौरभ नाईक यांनी मान्यवरांचा परिचय दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन डॉ. दिशा पंडित यांनी केले. या व्याख्यानाला स्कूल ऑफ स्कॉलर, ज्युबिली हायस्कूल, भारत विद्यालय, बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थिनी आणि शिक्षिकांची उपस्थिती होती. आनंद थत्ते यांनी सादर केलेल्या विश्वशांती प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप झाला. या वेळी आयएमएचे सचिव डॉ. पाचपोर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मुग्धा फडके, डॉ. साधना लोटे, अकोला योग फोरमच्या प्रकल्पप्रमुख मनीषा नाईक, धनंजय भगत, अर्जुन हिंगमिरे, अरविंद जोध, गजानन वाघोडे यांच्यासह बहुसंख्य पालक उपस्थित होते.
प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन
सुदृढ आरोग्यासाठी मुलींनी कोणकोणती आसने कशा प्रकारे करावी, याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. सोनल भेंडे अाणि पूनम यांनी ही प्रात्यक्षिके सादर केली. तसेच प्रत्येक पैलू उलगडताना डॉ. उज्ज्वला देशमुख यांनी विद्यार्थिनींना प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
योग शिक्षकांचा सत्कार
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अकोला योग फोरमच्या वतीने शहरात विविध ठिकाणी योग प्रशिक्षण सुरू आहे. योगाचे प्रशिक्षण देणारे योग शिक्षक यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यात योग शिक्षक अानंद थत्ते, काळे, सोनल भेंडे, जयश्री शेंडे, मंगला वाघोडे यांचा समावेश होता.
सामूहिक सूर्यनमस्कार आज
२१ जून रोजी सकाळी वाजता बालशिवाजी शाळा, सावरकर सभागृहात सामूहिक सूर्यनमस्कार होत असून, या उपक्रमात विश्वास निसर्गोपचार,योग केंद्र, अजिंक्य फिटनेस पार्क, योग एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन, आस्था योग फाउंडेशन, ब्राह्मण सभा, आयएमए, कुतूहल, ऑटोक्रॅट क्लासेस, अन्नपूर्णा देवी संस्थान, रेडक्रॉस, रोटरी क्लब, पूर्णवाद युवा फोरम, पूर्णवाद कन्या प्रतिष्ठान, निसर्ग कट्टा, विदर्भ कॅरम असो., अकोला योग परिषद, आर्य समाज, डीएव्ही कॉन्व्हेंट, गायत्री परिवार यांचा सहभाग आहे.
बातम्या आणखी आहेत...