आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीची आव्हानं पेलण्यास एकत्र या, स्ट्रेलिया येथील फिल जेफ्रीस यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- ग्लोबलवॉर्मिंगचा प्रभाव संपूर्ण जगावरच होताना दिसून येत आहे. निसर्गाच्या ऱ्हासाचे परिणाम समोर येत आहेत. भारताप्रमाणेच इतर देशातही शेतीची अवस्था दयनीय होत आहे. जागतिक स्तरावर शेतीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन फार्मर्स डायलॉग इंटरनॅशनलचे अध्यक्ष ऑस्ट्रेलिया येथील फिल जेफ्रीस यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील स्व. डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय शेतकरी परिसंवादाचे उद््घाटन झाले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. ‘शेतीतील महिलांचे सक्षमीकरण फायदेशीर तंत्रज्ञान’ या विषयावरील चार दिवसीय आंतरराष्ट्रीय शेतकरी परिसंवादाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, फार्मर्स डायलॉग इंटरनॅशनल, डॉ. पंजाबराव देशमुख अॅग्रिकल्चरल फाउंडेशन आणि सर रतन टाटा ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. परिसंवादातून जागतिक शेती व्यापक तसेच सर्वसमावेशक होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा फिल जेफ्रीस यांनी व्यक्त केली. अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबतच जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाल्यास भारतीय शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लागेल, असे मत खासदार संजय धोत्रे यांनी व्यक्त केले. भारतीय शेती आणि शेतकरी जगात सर्वोत्कृष्ट होण्यासाठी या परिसंवादाचा लाभ होऊ शकतो. या परिसंवादातून नुसती चर्चा होता त्यातून शेतकऱ्यांना दिशादर्शक कसा ठरू शकेल, या दृष्टीने विचार झाला पाहिजे.
शेतकऱ्यांची आत्महत्या, दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान आणि त्यातून शेतकऱ्यांवर वाढणारे कर्जाचे डोंगर याच गोष्टींवर चर्चा होता, यातून मार्ग कसा निघेल, त्यासाठी पर्यायी व्यवस्था, जोडधंदे अशा विविध घटकांविषयी चर्चा व्हावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. कृषी क्षेत्रात, शेतीत महिलांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. त्याशिवाय शेतीची भरभराट होणे नाही, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी केले. शेतीत महिलांचा सहभाग वाढावा, त्यांना नव नवीन उद्योगांसाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी नानाविध उपक्रम विद्यापीठाद्वारे राबवले जातात तसेच विदर्भातील कोरडवाहू शेतकरी अल्प भूधारक शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून एकात्मिक शेती तंत्रज्ञान यांत्रिकीकरणावर भर दिला जातो, अशी माहिती त्यांनी दिली. परिसंवादाच्या माध्यमातून विदर्भातील शेतकरी समृद्ध होईल या दृष्टीने कार्य होणे अपेक्षित असल्याचे मत शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केले.

पंचगणी येथील इनिशिएटिव्हज अॉफ चेंज या संस्थेच्या कार्यकारी संचालिका जयश्री राव यांनी परिसंवादाचे महत्त्व विशद केले, तर परिसंवादाची पार्श्वभूमी, आयोजनामागील उद्देश आयोजन समितीचे सचिव डॉ. संजय भोयर यांनी प्रास्ताविकेतून मांडला.
सूत्रसंचालन मोहिनी डांगे यांनी केले. आभार प्रसिद्धिप्रमुख डॉ. किशोर बिडवे यांनी मानले. या वेळी नागपूर येथील नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे, फार्मर्स डायलॉग इंटरनॅशनलचे सचिव ग्रेट ब्रिटन येथील जिम व्हिगन, पंचगणी येथील इनिशिएटिव्हज ऑफ चेंजचे निवासी संचालक रवींद्र राव, आंतरराष्ट्रीय शेतकरी प्रतिनिधी टांझानिया येथील जुलियाना स्वै, विस्तार शिक्षणाचे संचालक डॉ. प्रदीप इंगोले, सर रतन टाटा ट्रस्टचे प्रतिनिधी अमितांशू चौधरी, डी. पी. चौधरी, डॉ. गोविंदराव भराड यांच्यासह जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, अधिकारी, अभ्यासक, निमंत्रित शेतकरी प्रतिनिधी, विदर्भातील महिला शेतकरी, विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात गुरुवारी आंतरराष्ट्रीय शेतकरी परिसंवादाचे उद््घाटन झाले. या वेळी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.