आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोविंदांनी चढवले थरावर थर; रंगलेला सोहळा पाहण्यासाठी आबालवृद्धांनी केली गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ‘गोविंदा आला रे.. आला’च्या जयघोषात अन् डीजेच्या तालावर पाण्यात भिजत गोविंदांनी थरावर थर चढवले. गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी आज, 18 आॅगस्टला रंगलेला हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. गोविंदाचे थरावर थर लावणे अन् पाहता पाहता कोसळणे, पुन्हा नाचणे अन् थर लावणे हा आनंदोत्सव अकोलेकर अनुभवत होते.
शहरात यंदा पाच ठिकाणी दहीहंडी उत्सव झाला. यामध्ये कौलखेड परिसरात संत तुकाराम हॉस्पिटलसमोरील मैदानात शिव सेवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे दहीहंडी उत्सवाचे आयोजन झाले. या वेळी दहीहंडी फोडणार्‍या गोविंदा पथकासाठी प्रथम पारितोषिक 11 हजार रुपये रोख ठेवण्यात आले होते. सायंकाळी 7 पासून उत्सवाला प्रारंभ झाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवा मोहोड व कार्यकर्ते उपस्थित होते. डीजेच्या तालावर नाचत नाचत गोविंदांनी थर लावला. मात्र, क्रेनला लावलेली दहीहंडी वर घेतल्याने त्यांना फोडण्यात यश आले नाही. मात्र, त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच होते, अन् शेवटी त्यांनी दहीहंडी फोडली. हा सर्व रोमांच कौलखेडमधील नागरिक अनुभवत होते. दहीहंडी फुटताच सर्वांनी जल्लोष केला. उत्सवासाठी सागर मोहोड, राहुल सरोदे, अमोल कदम, चंदन गिरी, प्रथमेश देशमुख, प्रतीक वानरे, सागर देशमुख, राम इंगळे, सुनील दाते आदींनी पुढाकार घेतला.

कीर्तीनगरात रंगला दहीहंडी उत्सव
कीर्तीनगरात मातोश्री ज्येष्ठ नागरिक संघ, कीर्ती भजन मंडळ, मातोश्री भजन मंडळ, सत्यसाई सेवा समितीतर्फे नगरसेवक गोपी ठाकरे, सविता ठाकरे यांच्या नेतृत्वात दहीहंडी उत्सव झाला. परिसरातील नवदुर्गा मंदिरातून वाजत-गाजत गोविंदा पथक निघाले. या पथकात अग्रभागी डीजे व त्यामागे नाचणारी तरुणाई होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेल्या युवतीही नाचण्यात दंग झाल्या होत्या. सर्वात मागे बग्गीत बालगोपाल बनलेली मुले अन् राधा बनलेल्या चिमुकल्या होत्या. वाजत-गाजत गोविंदा पथक मातोश्री सभागृहानजीक उंचीवर बांधलेल्या दहीहंडीजवळ पोहोचले. ‘चांदी के डाल पर सोने का मोर’ या गीतावर युवक-युवती बेधुंद होऊन नाचत होते. त्यानंतर कमी उंचीवरील दहीहंडी लहान मुलांनी फोडली, तर त्यापेक्षा उंचीवरील दहीहंडी युवकांनी फोडली. या वेळी 50 किलोचा गोपाळकाला उपस्थितांना वितरित करण्यात आला तसेच बच्चे कंपनीला पुंगी, प्लास्टिक बॉल, शिटी, प्लास्टिकचे खेळणे वितरित करण्यात आले.

सुधीर कॉलनीतही गोविंदांची धूम
सुधीर कॉलनीतील पटांगणातही विवेकानंद उत्सव मंडळ व अखिल भारतीय विद्यार्थी मराठा महासंघाच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन झाले. साधारणपणे 20 फूट उंचीवरील या दहीहंडी उत्सवाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. त्यानंतर गोविंदांची दहीहंडी फोडण्यासाठी चढाओढ सुरू झाली. कार्यक्रमाचे आयोजन शरद पवार यांनी केले, तर द्वारका नगरीत नगरसेवक आशीष पवित्रकार यांच्या पुढाकाराने दहीहंडी उत्सवाचे आयोजन झाले. या वेळी परिसरातील युवकांनी मोठी गर्दी केली होती. डीजेच्या तालावर थिरकत त्यांनी महत्प्रयासाने दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवकांमध्ये काही कारणाने वाद निर्माण झाला. अखेर पोलिसांनी धाव घेत गोविंदा पथकाला शांत करत दहीहंडी खाली घेऊन त्यानंतर फोडण्यास भाग पाडले.