आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफांच्या ‘मध्यस्थ साखळी’चा पर्दाफाश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - चोरीच्या गुन्ह्यातील सोने खरेदी-विक्री आणि जप्तीच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या आणखी एका आरोपीची शुक्रवारी पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. यापूर्वी पोलिसांनी सोने जप्तीप्रकरणी दोघांना अटक केली होती. अटक केलेल्यांमध्ये एक जण सराफा व्यवसायाशी संबंधित होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 9 नोव्हेंबरला घरफोडीप्रकरणी तीन आरोपींना अटक केली होती. नकाशी आणि जुने शहरातील दोन घरफोडींमध्ये 406 ग्रॅम सोने चोरीस गेले होते. आरोपींनी सोने सराफा बाजारात विकल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी महावीर मिर्शीलाल वर्मा (वय 69, रा. काळा मारोतीरोड), जाकीर अली शहादत अली (वय 45, रा. मोहंमद अली चौकीच्या पाठीमागे) यांची चौकशी केली. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर सुरेश सोनी आणि बाबा भाई अशा दोघांची नावे समोर आली. वर्मा यांनी या दोघांच्या माध्यमातून काही सोन्याची विल्हेवाट लावल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांनी सोनी याला अटक केली. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुभाष माकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल शिवसिंग डाबेराव, मनोहर मोहोड, शेख हसन करत आहेत.

अशीही बदमाशी
अनेक सराफा व्यावसायिकांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दुकानात सीसी कॅमेरे लावले आहेत. या कॅमेर्‍यांच्या माध्यमातून चोरीच्या घटनाही उजेडात आल्या आहेत. मात्र, काही जण या कॅमेर्‍यांचा उपयोग वेगळ्याच कामासाठी करतात. काही जण आता थेट आरोपींकडून सोने विकत घेत नसून, सराफा व्यवसायाशी संबंधित असलेल्या मध्यस्थ, दलालांकडून सोने घेतात. हे मध्यस्थ, दलाल आरोपींकडून दुकानाच्या बाहेर सोने घेतात. त्यामुळे फुटेजमध्ये सोने खरेदी-विक्रीचा व्यवहार तसेच आरोपीचे चित्रण होत नाही. चोरीचे सोने खरेदीचा आरोप झाल्यास संबंधित दुकानदार हा पोलिसांना सीसी कॅमेर्‍यांचे फुटेज पाहण्यास सांगतो. मात्र, अशा प्रकाराचा त्रास प्रामाणिक सराफा व्यावसायिकांनाही होत आहे. त्यामुळे पोलिसांनी सखोल चौकशी करूनच कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.