आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गुड मॉर्निंग’ पथकाच्या अंमलबजावणीची गरज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन आणि निर्मल भारत अभियान यांच्या संयुक्त अभियानाचा आढावा लक्षात घेता, जिल्ह्यातील 542 ग्रामपंचायतींपैकी केवळ 47 गावेच हगणदारीमुक्त असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातून प्राप्त झाली. सद्य:स्थितीत केवळ पातूर तालुक्यात ‘गुड मॉर्निंग’ पथक कार्यान्वित झाले आहे.

जिल्हा परिषदेमध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन व निर्मल भारत अभियान कक्ष कार्यरत आहे. या अभियानात कंत्राटी स्वरूपात स्वतंत्ररीत्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, संनियंत्रण व मूल्यांकन अधिकारी, माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ यांच्या नियंत्रणात स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित आहे. तालुका स्तरावर गटविकास अधिकारी यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पंचायत विभागाच्या सहकार्याने निर्मल भारत अभियान राबवले जाते. पंचायत विभागाची स्वतंत्र यंत्रणा यासाठी कार्यान्वित असताना गेल्या दहा वर्षांत केवळ 47 गावेच हगणदारीमुक्त झाली. ही अभियानाची शोकांतिकाच म्हणावी लागेल. जिल्हय़ातील खासदार, आमदारांसह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्याच गावातील नागरिक उघड्यावर प्रात:विधी उरकत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या गावातूनच निर्मल भारत अभियानाला हरताळ फासला जात आहे.

दृष्टिक्षेपात अभियान :
प्रत्येक गाव हगणदारीमुक्त करण्यासाठी 2003-04 पासून संपूर्ण स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. एक दशक उलटले, तरी जिल्ह्यातील सर्व गावे हगणदारीमुक्त झाली नसल्याची शोकांतिकाच म्हणावी लागेल. 2012 पासून या अभियानाची व्याप्ती व गरज लक्षात घेता निर्मल भारत अभियान सुरू करण्यात आले आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनअंतर्गत लोकप्रतिनिधींनी अभियानात सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे.

प्रभावी अंमलबजावणीची गरज :
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत कडुकार यांच्या नियंत्रणात 18 डिसेंबरपासून पातूर तालुक्यात गुड मॉर्निंग पथकाने उघड्यावर शौचास बसणार्‍याविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. हे पथक दररोज सकाळी तालुक्यातील चार ते पाच गावांमध्ये उघड्यावर बसणार्‍या व्यक्तींना प्रतिबंध घालत आहे.

इतर तालुक्यांमध्येही पथकाची गरज :
अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बार्शिटाकळी, बाळापूर, मूर्तिजापूर, बाळापूर या तालुक्यातही निर्मल भारत अभियानांतर्गत गुड मॉर्निंग पथक सुरू करणे गरजेचे आहे.