आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापशी तलाव सौंदर्यीकरणाकडे दुर्लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- एकेकाळी शहराची तहान भागवणाऱ्या कापशी तलाव सौंदर्यीकरण योजनेसाठी राज्य शासनाने महापालिकेला एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. निधी मिळून १५ दिवसांचा कालावधी झाला असला तरी अद्याप निविदा प्रसिद्ध करण्याबाबत कोणत्याही हालचाली सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे या निधीची गतही चार कोटी रुपयांच्या निधीसारखी होईल का? अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
आतापर्यंत आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी पुढाकार घेतला. तत्कालीन उपायुक्त उमेश कोठीकर यांनी कापशी तलाव सौंदर्यीकरण योजना शासनाकडे पाठवून मंजूर करून आणली होती. साडेतीन कोटी रुपयांचा पहिल्या टप्प्यातील निधीही महापालिकेला प्राप्त झाला होता. या अनुषंगाने निविदाही प्रसिद्ध केल्या होत्या. परंतु, तत्कालीन आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांनी ही योजना रद्द करत हा निधी शासनाला परत केला. तेव्हापासून पुन्हा कापशी तलावाकडे दुर्लक्ष झाले. परंतु, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी कापशी तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी पुढाकार घेतला. महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवला. पालकमंत्र्यांच्या श्रमाला फळ आले आणि कापशी तलाव सौंदर्यीकरणासाठी डीपीडीसीतून महापालिकेला ९९ लाख ८७ हजारांचा निधी प्राप्त झाला.
विशेष म्हणजे महापालिकेला मॅचिंग फंड टाकण्याची अटही घातलेली नाही. त्यामुळे मनपाला पहिल्या टप्प्यातील कामे सुरू करणे शक्य होणार आहे. परंतु, दुर्दैवाने निधी प्राप्त होऊन १५ दिवसांचा कालावधी झाला असताना अद्याप पहिल्या टप्प्यातील कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही. अभियंत्यांना मालमत्ता मोजमाप करण्याचे अतिरिक्त काम करावे लागत असल्याचे कारण पुढे केले जात असले, तरी मंजूर झालेला निधी त्वरित खर्च केल्यास पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील निधी महापालिकेला प्राप्त होईल. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
तलावाची जागा कोणाची?
कापशी तलाव जागेचा नमुना ‘ड’ उपलब्ध नाही. नमुना शोधण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार निविदा प्रसिद्ध करण्यापूर्वी नमुना आवश्यक ठरणार आहे. नमुना डमध्ये कापशी तलावाची एकूण जागा किती? याची माहिती मिळेल त्यानुसारच भिंत बांधावी लागणार आहे.
भिंत उद्यानासाठी खर्च
तलावाव्यतिरिक्त जागेला कंपाउंड, उद्यान करण्यासाठी निधी खर्च केला जाणार आहे. तलावाच्या मोकळ्या जागा बळकावण्याचा प्रकार सुरू असल्यानेच पहिल्या टप्प्यात कंपाउंड बांधल्या जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विविध सुविधा उपलब्ध करण्यात येतील.