आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मशानभूमीच्या वादातून दलित महिलेचा अंत्यविधी रोखला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे- स्मशानभूमीची जागा सरकारी की खासगी या वादाने गंभीर वळण घेतल्याने चिंभळे (ता. श्रीगोंदे) येथे दलित महिलेचा अंत्यविधी शनिवारी दहा तास ग्रामस्थांनी रोखून धरला. आमदार बबनराव पाचपुते व प्रांताधिकारी संतोष भोर यांनी हस्तक्षेप केल्यानंतर अंत्यविधी करण्यास ग्रामस्थांनी होकार दिला.

लक्ष्मीबाई अडागळे (65) या दलित महिलेचा शुक्रवारी (2 मे) रात्री चिंभळे येथे मृत्यू झाला. अंत्यविधीसाठी मध्यरात्री प्रेतयात्रा स्मशानभूमीत पोहोचली. तोपर्यंत काही ग्रामस्थ तेथे जमले होते. ही स्मशानभूमी खासगी जागेत बांधली आहे. स्मशानभूमीची मूळ जागा अन्यत्र आहे. त्यामुळे आम्ही येथे अंत्यविधी होऊ देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. अडागळे कुटुंबीय भयभीत होऊन शांत बसून दिवस उजाडण्याची वाट पाहू लागले.
शनिवारी सकाळी ही बाब तहसीलदार अनिल दौंडे यांना समजली. ते तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. तोपर्यंत पाचपुते येथे पोहोचले होते. प्रांताधिकारी संतोष भोर देखील तेथे आले. या सर्वांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. खासगी जागेत स्मशानभूमी असेल, तर चौकशी करून ती हटवण्यात येईल, असे आश्वासन प्रांताधिकारी व पाचपुतेंनी देत ग्रामस्थांची समजूत घातली. अखेर ग्रामस्थांनी आमदार पाचपुतेंच्या विनंतीला मान देऊन अंत्यविधी करण्यास परवानगी दिली. शोकाकुल व तणावपूर्ण वातावरणात लक्ष्मीबाईला शनिवारी अंतिम निरोप देण्यात आला.
तांत्रिक चूक दुरुस्त करू
स्मशानभूमीची जी मूळ जागा आहे, प्रत्यक्षात तिथे बांधकाम न होतो. दुसर्‍याच गटात केल्याचे समोर आले आहे. त्याबाबत चौकशी केली जाईल. चूक असेल, तर ती दुरुस्त करण्यात येईल.’’ संतोष भोर, प्रांताधिकारी, पारनेर - श्रीगोंदे.
महाराष्ट्रासाठी शरमेची बाब
दलित महिलेला मृत्यूनंतरही संघर्षाला सामोरे जावे लागते. पुरोगामी महाराष्ट्राला ही शरमेची बाब आहे. अंत्यविधी रोखणे अमानवी घटना आहे. समंजसपणा दाखवून ग्रामस्थांनी आधीच वाद मिटवायला हवा होता.’’ वसंत सकट, जिल्हाध्यक्ष, बहुजन रयत परिषद.