अकोला - स्वच्छता,आरोग्य आणि बांधकाम विभागाने शहराच्या अनेक भागात ग्रीन ग्राउंड तयार केले आहेत. डोळ्याला हे ग्राउंड हिरवेगार दिसत असले तरी या ग्राउंडमध्ये दिमाखाने
आपला हक्क सांगणाऱ्या हिरव्यागार वनस्पती आणि त्यामुळे डासांचा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे मात्र सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. हिरवीगार मैदाने माणसाला आरोग्य राखण्यास मदत करणारी ठरतात. मात्र, या मैदानांमुळे नागरिकांना विविध आजारांनी ग्रासले आहे.
शहराच्या अनेक भागांत सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था कोलमडली आहे. काही भागात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या फुटल्या आहेत, तर काही भागात अद्यापही सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याच नाहीत. परिणामी, सांडपाणी ज्या ठिकाणी जागा मिळेल तिथे आपला मुक्काम ठोकते. शहरात फडकेनगर, सोपीनाथनगर, अयोध्यानगर, रेणुकानगर, बाजोरिया नगरी, आरोग्यनगर, आझादनगर, बंजारा कॉलनी, केशवनगर, अकोटफैल, शारदानगर आदी अनेक भागांत अनेक महिन्यांपासून सांडपाणी साचले आहे. हे सांडपाणी जलकुंभी तसेच अन्य वनस्पतींसाठी पोषक आहे. त्यामुळे सांडपाण्याने भरलेली ही मैदाने हिरवीगार झाली आहेत. ज्या भागात ही हिरवीगार मैदाने तयार झाली आहेत, त्या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अद्याप तक्रार नाही
शहरामध्येमोकळ्या जागेत सांडपाणी साचल्याची आतापर्यंत कोणतीही तक्रार आम्हाला प्राप्त झालेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यानंतर सबंधितांवर कारवाई करण्यात येईल. '' सुरेशपुंड, स्वच्छताअधिकारी, महापालिका अकोला.
डेंग्यूला निमंत्रण
अनेकमहिन्यांपासून सांडपाणी साचले असेल तर डासांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते. त्यामुळे अशी साचलेली गटारे नागरिकांना तापासह डेंग्यूसारख्या आजारांना निमंत्रण देणारीच ठरतात.'' डॉ.नितीन अंबाडेकर, जिल्हाआरोग्य अधिकारी.
बिट जमादार कशासाठी?
विविधघटना तसेच समस्या तत्परतेने झोन अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी बिट जमादार संकल्पना राबवली. एका प्रभागात दोन बिट जमादार आहेत, परंतु असे असतानाही झोन अधिकारी या साचलेल्या सांडपाण्याबाबत कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे बिट जमादार ही योजना कागदावरच राहिली का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तक्रारींवर कारवाई नाही : सांडपाणीसाचल्याबाबत अनेक नागरिकांनी पश्चिम झोन कार्यालयात तक्रारी दिल्या आहेत. या तक्रारी देऊन महिना उलटून गेला, परंतु अद्यापही साचलेल्या सांडपाण्याबाबत कोणतीही कारवाई केल्या गेलेली नाही.
नगरसेवकही फारसे उत्सुक नाहीत : समस्यासोडवण्याची जबाबदारी नगरसेवकांची असते. प्रभागातील समस्या मार्गी लावण्यासाठी काही नगरसेवक प्रयत्नही करतात. परंतु, अनेक प्रकरणात तोडफोड करणारे नगरसेवक या प्रकरणात मात्र त्या तुलनेने शांत आहेत.