आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Guarded To Play Kridagunance Display Commissioner Bhaskararava Valimbe

‘संयमाने खेळत क्रीडागुणांचे प्रदर्शन करावे-आयुक्त भास्करराव वाळिंबे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-आज खेळाचे महत्त्व प्रत्येकाला पटले आहे. त्यामुळे अनेकविध स्पर्धांचे सातत्याने आयोजन होते. अशा स्पर्धांमधून संयमाने खेळत आपल्या क्रीडागुणांचे प्रदर्शन खेळाडूंनी करावे, असे आवाहन करून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या या स्पर्धांसोबतच येत्या वर्षात अधिकारी व कर्मचार्‍यांसाठीही विभागीय स्तरावरच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचा मानस आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त भास्करराव वाळिंबे यांनी व्यक्त केला.
अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग, अमरावतीअंतर्गत येणार्‍या शासकीय, अनुदानित आश्रमशाळांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेचे आज, 29 जानेवारीला वसंत देसाई क्रीडांगणावर थाटात उद्घाटन झाले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंग जाधव, आदिवासी विभागाचे उपायुक्त एम. जी. राघोर्ते, संगीता आत्राम, र्शी. पाटील, अकोला प्रकल्पाचे अधिकारी नितीन तायडे, सुखदेव डाबेराव, र्शी. देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी सातही प्रकल्पांमधून सहभागी झालेल्या खेळाडूंनी पथसंचलन केले. पथसंचलनात राजीव गांधी सैनिकी शाळा, बुलडाणा, यशवंतराव चव्हाण सैनिकी शाळा, वाशिम, राजमाता जिजाऊ सैनिकी आदिवासी मुलींची शाळा, चिखली, सैनिकी शाळा, गायगाव, अकोलासह धारणी, पांढरकवडा, किनवट, पुसद, कळमनुरी, औरंगाबाद येथील आश्रमशाळांमधील 1200 वर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून ध्वजवंदन करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत खेळाडू व पंच यांना शपथ देण्यात आली.
खामगाव तालुक्यातील सहानपुरी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर उपस्थितांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकोला प्रकल्प अधिकारी नितीन तायडे यांनी केले. सूत्रसंचालन जवाहर चरडे यांनी केले. दिलीप खोकले यांनी आभार मानले.