आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उधळाल बनावट ‘गुलाल’ जीवनात व्हाल ‘बेहाल’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - उत्साहाच्या भरात, आनंदाच्या जल्लोषात गुलाल उधळणे आता आरोग्यासाठी घातक ठरणार आहे. कारण गुलालात बेसुमार भेसळ होत असल्याने, त्याचा त्वचेवर व डोळ्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. बनावट गुलाल उधळल्यामुळे जीवन बेहाल होऊ शकते. पारंपरिक पद्धतीने बनवण्यात येणारा गुलाल आता लोप पावत आहे.

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व निवडणुकांमध्ये गुलालाची सर्वाधिक उधळण होते. गुलालात मोठय़ा प्रमाणात भेसळ होत असल्याचे पोलिसांनी बुधवारी केलेल्या कारवाईवरून स्पष्ट झाले. गुलालामुळे त्वचा, श्वासनलिका, हृदय, डोळे, कान, नाक, डोक्यांवरील केस आदींवर दुष्परिणाम होतो. गुलाल बनवण्याचे तीन कारखाने शहरात आहेत.

असा असतो पारंपरिक गुलाल
पूर्वी वापरल्या जाणारा गुलाल हा पारंपरिक व पर्यावरणपूरक तयार करण्यात येत होता. त्यामध्ये चिंचोक्याची भुकटी, गेरू, पळसाच्या फुलांपासून तयार केलेला रंग आदींचा वापर व्हायचा. आता ही पद्धत लोप पावत असून, सर्रास बनावट गुलाल बनवण्यात येतो.

असा हा बनावटपणा
बनावट गुलाल तुलनेत वजनदार असतो. तो हवेत उडत नाही. अंगावर किंवा डोक्यावर पडल्यावर जळजळ होते. बनावट गुलाल खडतर असतो. या निकषाच्या आधारे बनावट गुलाल सहज ओळखणे शक्य आहे.

अशी होते भेसळ
मार्बलच्या भुकटीचा वापर करून गुलालात भेसळ केली जाते. चुना, माती, फन्की व रांगोळीदेखील मिसळली जाते. बनावट गुलालाला गुलाबी रंग येण्यासाठी रासायनिक रंगाचा वापर केला जातो.

आरोपींना कोठडी
बनावट गुलाल प्रकरणी गुरुवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 29 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी मोहंमद शफी अब्दुल रज्जाक व मोहंमद मुश्ताफ मोहंमद मनसूर या दोन बनावट गुलाल तयार करणार्‍या आरोपींना पोलिसांनी रंगेहात पकडले होते.

अंधत्व येऊ शकते
डोळ्यात बनावट गुलाल गेल्यामुळे बुबूळाला इजा होते. या इजेमुळे कायमचे अंधत्व येऊ शकते. त्यामुळे गुलाल उघळणे टाळणेच र्शेयस्कर ठरेल. अन्यथा आपले जीवन अंधकारमयदेखील होऊ शकते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. डॉ. चंद्रकांत पनपालिया, नेत्रतज्ज्ञ

त्वचेचे आजार
निकृष्ट दर्जाच्या गुलालामुळे त्वचारोग होण्याची भीती असते. त्यामुळे चांगल्या दर्जाचा गुलाल वापरावा. गुलाल उधळताना प्रत्येकाने काळजी घेतल्यास ही शारीरिक हानी होणार नाही. बनावट गुलालापासून बचाव करावा. डॉ.श्रीकांत वराडे, त्वचारोग तज्ज्ञ

गुलालाचे महत्त्व
पौराणिक काळापासून गुलालाचा वापर पूजेत होत आहे. आध्यात्मिकदृष्ट्या एक सुगंधित द्रव्य म्हणूनही गुलालाचा वापर केला जातो. गुलाल कपाळावर लावण्याची प्रथा आहे. कंपाळामध्ये आज्ञाचक्र असल्याने स्थिर विचार राहण्यासाठी कपाळावर गुलाल लावण्यात येतो, अशी माहिती श्रीरामशास्त्री गदाधर यांनी दिली.

परराज्यातून येतो माल
अकोल्यात ब्रॅन्डेड कंपन्यांचे गुलाल मध्य प्रदेशमधील इंदूर, गुजरातमधील अहमदाबाद व महाराष्ट्रातील पुणे, मुंबई येथून येतो. या गुलालाची किंमत बनावट गुलालापेक्षा जास्त आहे. दहा किलोची बॅग 100 रुपयांपर्यंत तर 25 किलोची बॅग 300 रुपयांपर्यंत आहे. अकोल्यात गुलालालाची आर्थिक उलाढाल वर्षाकाठी 1 कोटीच्या घरात असल्याचे ठोक विक्रेत्यांनी सांगितले.