आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gurdian Minister Dr.Ranjit Patil Investigat Navodaya Vidyalaya

पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी 'नवोदय'ची केली चौकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बाभुळगावच्या जवाहर नवोदय विद्यालयातील ४९ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी दोन्ही शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विनयभंग प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी विद्यालयास भेट दिली. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून, विद्यालय प्रशासनाच्या अहवालानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.

बैठकीला विद्यालयाचे प्राचार्य आर. ए. सिंह, पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा, अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, सहायक पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीणकुमार मुंढे, बालकल्याण समितीचे सदस्य संजय सेंगर उपस्थित होते. पुढे ते म्हणाले की, सदर प्रकरणात विद्यालय प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीची दिशा कशा प्रकारची आहे, याचा अहवालही घेतला जात आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता यातील काही महत्त्वाच्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. तसेच सदर प्रकरणातील चौकशीची गुप्तताही पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, यातील शिक्षक शैलेश रामटेके याच्यावर याआधीपण अशाच प्रकारचे आरोप झालेले असल्याची माहिती आहे. याचीही चौकशी करू. आरोप असतील, तर त्यांना परत कोणत्या मुद्द्यावर नियुक्ती दिली त्या वेळी त्यांच्यावर कुठली कारवाई झाली याचीही शहानिशा करू, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांकडूनही या घटनेची चौकशी सुरू आहे. त्यांनी किती मुलींशी असा प्रकार केला यापेक्षा पीडित मुली तक्रारीसाठी समोर आल्या हे महत्त्वाचे आहे. दरम्यान, फरार शिक्षकांना पोलिस लवकरच अटक करतील, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

जामिनासाठीशिक्षकांची धडपड : नवोदयच्यात्या दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी शिक्षकांनी अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू केली आहे. नोकरी टिकवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे, तर पोलिस या दोघांचाही कसून शोध घेत असून, या प्रकरणाबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे.

गंभीर आरोप असताना शिक्षकांना पुन्हा नियुक्ती कशी? : यातीलएका शिक्षकावर गडचिरोली येथील नवोदय विद्यालयात अशाच प्रकारची गंभीर तक्रार होती. त्यातून त्याला क्लीन चीट कशी मिळाली. ती कुणी दिली. आणि तो शिक्षक पुन्हा कसा रुजू झाला. याविषयीची माहिती मागवण्यात येणार आहे. पुन्हा त्या प्रकारची नव्याने चौकशी करण्याचे आदेश देऊन त्यांना पुन्हा नियुक्ती देणाऱ्यांवरसुद्धा कठोर कारवाईचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
प्राचार्यावरही होणार कारवाई : २१मार्चला प्राचार्यांकडे शिक्षक गजभियेविरोधात तक्रार झाली. त्यांनी ती दहा दिवस का दडवली, याचीही चौकशी करू. त्यात दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई होईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री डॉ. पाटील यांनी दिले. अशा प्रकारची तक्रार विद्यालयातील कर्मचाऱ्यांवर झाली, तर त्याबाबत काय कारवाई करावी, यासंदर्भातील सूचना विद्यालयाच्या मॅन्युअलमध्ये आहेत. त्यातील सूचनांवरून ती कारवाई केल्या जाईल.

पारदर्शी चौकशीसाठी केले निलंबन
दोन्हीशिक्षकांच्या पारदर्शी चौकशीसाठी निलंबनाचे आदेश आले. दोन्ही शिक्षक फरार असल्यामुळे त्यांच्या दारांवर शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता निलंबनाचे आदेश चिटकवले.'' आर.ए. सिंह, प्राचार्य

जवाहर नवोदय विद्यालयात शुक्रवारी काही मुलींचे बयाण महिला बालकल्याण समितीने घेतले. मुलींनी संदीप मनोहर लाडखेडकर या शिक्षकावरही विनयभंगाचे आरोप केले. त्यावरून पोलिसांनी शुक्रवारी रात्री संदीप लाडखेडकर यास चौकशीसाठी ठाण्यात बोलावले. त्यानंतर बालकल्याण समितीच्या संगीता भाकरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी लाडखेडकरविरुद्ध गुन्हा दाखल करून, त्यास अटक केली. आरोपींची संख्या तीन झाली.