आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात गुटख्याची तस्करी मध्य प्रदेशातून

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अकोल्यात मध्य प्रदेशातून मोठय़ा प्रमाणात गुटख्याची तस्करी होत आहे. गुटखा माफियांसोबत अन्न व प्रशासन विभागातील अधिकार्‍यांचे असलेले लागेबांधे यामुळे शहरासह जिल्ह्यात अधिक प्रमाणात अवैध गुटखा विक्री होत आहे. कारवाईचा केवळ देखावा केला जात आहे. तसेच खाद्य पदार्थांचे नमुने घेण्याच्या नावावर अन्न निरीक्षकांनी आपले दुकान थाटले आहे. याची गंभीर दखल घेत अमरावती विभागातील सहआयुक्तांनी अकोल्यात कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे स्थानिक अन्न निरीक्षकांचे धाबे दणाणले आहे.

राज्य शासनाने गेल्या दीड वर्षांपासून राज्यात गुटखा बंदी केली आहे. मात्र, जिल्ह्यात सध्या मोठय़ा प्रमाणात अवैध गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. दरम्यान, सण, उत्सवाच्या काळात दरवर्षीच अन्न व प्रशासन विभाग कारवाईचा देखावा करत आपला हप्ता वाढवून घेतो, असा आरोप होत आहे. याच्या अनेक तक्रारी विभागीय आयुक्त कार्यालयात झाल्याने सहआयुक्त सुरेश देशमुख व त्यांच्या पथकाने अकोल्यातील गुटखा माफियांसह खाद्य पदार्थांत भेसळ करणार्‍यांवर कारवाईचा फास आवळला आहे. हे झालेल्या कारवाईवरून सिद्ध झाले आहे. मोठे एजन्सीधारक यांच्यावर विशेष कृपादृष्टी या विभागाची आहे. त्यांच्यावर कधीच कारवाई झालेली नाही.

गुटखा विक्रेत्यांवरील कारवाई म्हणजे मी मारल्यासारखे करतो तु रडल्यासारखे कर अशी काहीशी स्थिती अकोला येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांची झाली आहे. त्यामुळे गुटखा विक्रेत्यांसह गुटखा शौकिनांचेही फावत आहे.

खाद्य पदार्थांत केमिकल कलरचा वापर
शहरासह जिल्ह्यातील पुंगळी कारखानाधारक पुंगळी तयार करत असताना खाद्ययुक्त कलर वापरत नाही. तो पूर्ण कलर केमिकलयुक्त असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. दाल मिल, ऑइल मिल, बेसन मिल यांचे नमुने घेण्याच्या नावावर मोठय़ा प्रमाणात वसुली केली जाते. त्यामुळे याचा थेट परिणाम शरीरावर होत आहे. मात्र, यांचे काहीही सोयरसुतक अन्न व औषध प्रशासन विभागाला नाही.

बेलुरा भागात गुटखा माफियांचे गोडाऊन
अमरावती जिल्ह्यातील बेलुरा परिसरात गुटखा माफियांचे गोडाऊन आहे. येथूच चार ते पाच जिल्ह्यात गुटखा माफियांना अवैध प्रमाणात गुटखा पुरवल्या जातो. हा सर्व प्रकार अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने होत आहे.

गुटखा मिळतो 60 रुपयाला
एका नामांकित असलेली गुटख्याची पुडी काळ्या बाजारात सुमारे 60 रुपयाला विक्री होत आहे. यासोबतच गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. त्याअनुषंगाने अमरावती विभागातील अधिकार्‍यांनी अकोल्यातील अवैध गुटखा विक्रीवर करडी नजर ठेवली आहे.

हैदराबादवरून येतो गुटखा
हैदराबादवरून वाशिम मार्गे पातूर, अकोल्यात मोठय़ा प्रमाणात गुटखा येत आहे. शहरात एका विशिष्ट भागातून अकोला शहरासह जिल्हय़ात अवैध प्रमाणात गुटख्याची विक्री होत आहे. याला अधिकार्‍यांचे पूर्ण पाठबळ आहे. त्यामुळेच शहरात अवैध गुटख्याची सर्रास विक्री होत आहे.

कलम 328 नुसार कारवाई
जिल्ह्यात अवैध प्रमाणात गुटखा विक्री होत आहे. याबाबत गुटखा विक्री करणार्‍यांवर कलम 328 नुसार कारवाई करण्यात येत आहे. गुटखा निर्मूलनासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग कटिबद्ध आहे. मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन