आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hailstorm Affected Village News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गारपीटग्रस्त गावच काढले विक्रीला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणार (जि. बुलडाणा) - या वर्षी झालेल्या गारपिटीमुळे राज्यातील अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले. शासनाने तुटपुंजी मदत देऊन मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला, मात्र महसूल यंत्रणेने त्यातही आपले उखळ पांढरे करून घेतले. ‘आत्महत्याग्रस्त शेतकरी’ असा कलंक लागलेल्या विदर्भातील महारचिकना (ता. लोणार) या गावातील शेतकरीही शासनाच्या आर्थिक मदतीपासून वंचित राहिले. हाती आलेली पिके गारपिटीने हिरावली व आता वरुणराजाने दडी मारल्यामुळे हे ग्रामस्थ आर्थिक संकटात सापडले आहेत. देणेकर्‍यांची रक्कम देण्यासाठी त्यांनी ‘महारचिकना गाव विकणे आहे’ असा फलकच गावासमोर लावला आहे.

या वर्षी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले होते. त्यानंतर तलाठ्यांनी महारचिकना परिसरातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून अहवाल तयार केला. मात्र, अहवाल तयार करताना काही शेतकर्‍यांना वगळले तर मर्जीतील मोजक्याच शेतकर्‍यांचा आर्थिक मदतीच्या यादीत समावेश केल्याचा आरोप या गावातील शेतकर्‍यांनी केला आहे.

गारपिटीच्या संकटात शेतीचे शंभर टक्के नुकसान होऊनही शासकीय मदत न मिळाल्याने उदरनिर्वाह करणे या गावकर्‍यांना कठीण झाले आहे. देणेकरांचे देणे देण्यासाठी तसेच खरीप हंगामासाठी बियाणे व खत घेण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे आम्ही गावच विक्रीला काढल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. त्यांनी या आशयाचा फलकच गावासमोर लावला आहे.

आगामी सात दिवसांत नुकसानग्रस्त भागाचे पुन्हा सर्वेक्षण करून न्याय न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही शेतकर्‍यांनी दिला आहे. प्रकाश नागरे, शिवानंद कायंदे, गजानन घुगे, शिवाजी ढाकणे यांच्यासह असंख्य शेतकर्‍यांनी तहसीलदारांना या संदर्भात निवेदन सादर केले आहे.

एकाही शेतकर्‍यावर अन्याय होणार नाही
या गावातील कोणत्याही शेतकर्‍यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. शेतकर्‍यांनी आंदोलनाचा मार्ग न अवलंबता शांतता राखावी. प्रशासनाच्या वतीने पावले उचलली जातील.’’ - मनीष गायकवाड, तहसीलदार

आदेशानंतर चौकशी करणार
नुकसान झालेल्या शेतीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्या प्रमाणात मदतीची यादी तयार करण्यात आली. यानंतरही कोणाची नावे सुटली असतील तर अधिकार्‍यांच्या आदेशानंतर चौकशी करण्यात येईल.’’ - अशोक सौंदर, तलाठी, लोणार.