आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hailstorm Relife News In Marathi, Farmer Subsidy, Divya Marathi

नुकसानीचे पंचनामे अद्याप अपूर्ण; शेतकर्‍यांच्या अनुदानाकडे नजरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला 25 मार्चपर्यंत गारपिटीचे पंचनामे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, 24 तारखेपर्यंत जिल्हय़ातील गारपीटग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे करण्याचे काम अद्याप 100 टक्के पूर्ण झाले नाही. शासनाने तत्काळ आर्थिक मदत देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात मदत कधी मिळणार, असा प्रश्न शेतकर्‍यांना भेडसावत आहे.


फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जिल्हय़ात गारपीट, पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाकडून नजरअंदाज पाहणीनुसार अहवाल तयार करून शासनाकडे पाठवला जात आहे. परंतु, पीक, शेतकरी, गाव आणि हेक्टरनिहाय मूळ पंचनामे करण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याची ओरड शेतकर्‍यांमधून होत आहे. जिल्हा प्रशासनाने तत्काळ पीकनिहाय पंचनामे करून किती प्रमाणात मदत मिळेल याची घोषणा करण्याची मागणी होत आहे. जिल्हय़ात झालेल्या गारपिटीसंदर्भात जिल्हा प्रशासनाने दौरे करून पाहणी केली, तर दुसरीकडे राजकीय पुढार्‍यांनीसुद्धा दौरे करून पाहणी केली.


जिल्हय़ातील 28 हजार हेक्टर शेतीवरील पिके गारद
नुकसान झालेल्या पिकांचे सर्व्हे करून, पात्र लाभार्थींची यादी चावडी, ग्रामपंचायत, कृषी सहायक यांच्या कार्यालयात 25 मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. मात्र, आजपर्यंत कोणत्याच गावात चावडी वाचन किंवा नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या यादय़ा प्रसिद्ध करण्यात आल्या नाहीत. गारपिटीमुळे जिल्हय़ातील 28 हजार 892 हेक्टरवरील शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.


नुकसानीचा अहवाल दिल्यानंतरच ठरणार मदत : जोपर्यंत जिल्हा प्रशासनाचा नुकसानीचा अहवाल शासनाकडे जात नाही, तोपर्यंत जिल्हय़ाच्या पॅकेजची नेमकी रक्कम ठरणार नाही. त्यामुळे तातडीने पीकनिहाय सर्व्हे होऊन शासनाकडे तत्काळ पाठवणे आवश्यक आहे.


दोन-तीन दिवस लागतील
सर्व्हेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अजूनही दोन-तीन दिवस लागतील. एका तालुक्याचा सर्व्हेचा अहवाल येणे बाकी आहे. अहवाल लवकरच जिल्हा प्रशासनाला सुपूर्द करू.’’ प्रमोद लहाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.