आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Health News In Marathi, Cough Disease In Akola, Divya Marathi

खोकल्याने अकोलेकर हैराण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मागील काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे अकोलेकर खोकल्याने त्रस्त झाले आहेत. लहान मुलांप्रमाणेच मोठय़ांनादेखील सर्दी, खोकला, ताप असे आजार होत आहेत. ताप, सर्दी काही दिवसांत बरी होत असली तरी, खोकला लवकर बरा होत नाही. दीर्घकाळ चालणारा खोकला असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
वातावरणात झालेला बदल, आद्र्रता व कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे शहरात गारपीट व पाऊस झाला. त्यामुळे हवामानात अचानक बदल होऊन थंडीचे प्रमाण वाढले. त्याचाच परिणाम म्हणजे सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तीन ते चार दिवसांत बरा होणारा खोकला 15 दिवस उपचार घेऊनही बरा होत नाही. त्यातही रात्री वाढणार्‍या खोकल्याचे प्रमाण जास्त आहे. सतत खोकलल्यामुळे छातीत दुखण्याचे प्रमाणही वाढत आहे. लहान मुलांना निमोनिया, अतिसार, गोवर, काजण्या असे आजार काही प्रमाणात होत आहेत. घशाच्या आजारांसह टॉन्सिल्सचा त्रासदेखील होत आहे. काही रुग्णांमध्ये एकाच वेळी दोन-तीन आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. वातावरणातील अचानक बदलामुळे आजारांमध्ये वाढ होऊन, दवाखाने रुग्णांनी भरलेली दिसून येत आहेत. पश्चिम किनार्‍यावर आर्द्रतेचे प्रमाण वाढणार असून, येत्या दोन दिवसांत विदर्भात हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण वाढून आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
ही काळजी घ्यावी
पाणी उकळून प्यावे.
  • सर्दी, खोकला असणार्‍यांच्या संपर्कात येऊ नये.
  • आंबट पदार्थ खाणे टाळावे.
  • थंड पेय, थंड पदार्थ, बर्फ सेवन टाळावे.
  • खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे.
  • परिसर स्वच्छ ठेवावा.
लहान मुलांची काळजी घ्यावी
लहान मुलांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. बदलत्या वातावरणात लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. खाण्यापूर्वी त्यांनी हात धुणे बंधनकारक करावे.’’ डॉ. पराग जोशी
खोकल्यात रात्री होते वाढ
सध्याच्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, ताप लवकर बरा होत आहे. खोकला बरा होत नसून, रात्री खोकल्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.’’ डॉ. फारुख शेख