आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Health Service News In Marathi, Health Department, Doctor, Divya Marathi

ग्रामीण भागातील सेवेसाठी डॉक्टरांना मिळणार ‘चॉइस’,आरोग्य विभागाची नवी शक्कल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांना सुरुवातीचा काही काळ ग्रामीण भागामध्ये सेवा करणे अनिवार्य आहे. मात्र, असे असताना ग्रामीण भागांमध्ये जाऊन सेवा देण्यास डॉक्टर तयार नसतात. त्यामुळे आरोग्य विभागाने आता डॉक्टरांना ग्रामीण भागातील त्यांचा पसंतीक्रम ठरवण्याचा अधिकार त्यांना दिला आहे. ही नवी शक्कल आरोग्य विभागाने शोधून काढल्याने ग्रामीण भागात डॉक्टर जाण्यास मदत होणार आहे.


ग्रामीण भागामधील वैद्यकीय अधिकार्‍यांची राज्यांमध्ये हजारो पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी आरोग्य विभागाने डॉक्टरांना त्यांच्या सोयीनुसार गाव आणि जिल्हा निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. यामुळे ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या जागांचा अनुशेष भरण्यास मदत होणार असून, ग्रामीण जनतेला चांगल्या वैद्यकीय सोयी मिळण्यास मदत होणार आहे. पूर्वी डॉक्टरांना नोकरीकरिता पाहिजे तो जिल्हा उपलब्ध नसल्याने तेथे नोकरी करण्याकरिता त्यांच्यामध्ये नाराजी असायची. मात्र, आता त्यांना आवडत्या जिल्हय़ात नोकरी उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येक पाच किलोमीटरच्या आत ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयांचे जाळे आहे. मात्र, या रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर सेवा देण्यात तयार नसल्याने परिणामी, सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना उपचाराकरिता खासगी रुग्णालय किंवा शहरात येण्याशिवाय पर्याय नसतो. याची दखल घेऊन आरोग्य विभागाने एक पाऊल मागे येऊन डॉक्टरांना पसंतीक्रम ठरवण्याचे स्वातंत्र दिले आहे. विशेष म्हणजे, यानुसार प्रथमच आवडीनुसार डॉक्टरांना हवा असलेला जिल्हा सेवा करण्याकरिता उपलब्ध होणार आहे. यापुढे मुलाखतीला बोलावलेल्या डॉक्टरांसमोर एक प्रोजेक्टर लावले जाणार आहे. यावर कोणत्या जिल्हय़ात किती पदे रिक्त आहेत, ते नमूद केले जाईल.


एखाद्या डॉक्टरने आपल्या आवडीनुसार जिल्हा निवडल्यास त्या ठिकाणच्या सेवेसाठी त्यांचा विचार केला जाणार आहे. ही प्रक्रिया केल्यानंतर तत्काळ त्यांना नियुक्तिपत्र दिले जाणार आहे. सध्या राज्यामध्ये वैद्यकीय अधिकार्‍यांची 1,881 पदे रिक्त आहेत. केवळ ग्रामीण भागामध्ये सोयीचे ठिकाण मिळत नसल्यामुळे एवढा मोठा अनुशेष वाढला असून, त्याचा फटका ग्रामीण रुग्णांना बसत आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे भरली जाणार आहेत, तर दुसर्‍या टप्प्यामध्ये विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची पदे भरली जाणार असल्याची माहिती आहे.


ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होतील
अगोदर ग्रामीण भागात सेवा करण्यासाठी डॉक्टरांपुढे चॉइस नसायचा. त्यामुळे डॉक्टर ग्रामीण भागात जाण्यास तयार होत नसत. आता मात्र डॉक्टरांना सोयीचे ठिकाण निवडता येत असल्यामुळे दुर्गम भागातही नोकरी करण्यासाठी जवळपास 500 डॉक्टरांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या जागांचा अनुशेष भरून काढण्यासाठी मदत होईल. सुजाता सौनिक, प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नेत्र तज्ज्ञ