आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोळा वर्षांनंतर बुलडाणा हरवले अभूतपूर्व धुक्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - "वनलक्ष्मीच्या वैभवाचे अलौकिक लेणे नाव तयाचे बुलडाणे', ही बुलडाण्याच्या निसर्ग सौंदर्याची भरभरून तारीफ करणाऱ्या कवी बी यांच्या कवितेची साक्ष गेल्या दोन दिवसांपासून बुलडाणेकरांना देत आहे. दोन दिवसांपासून गारठलेल्या बुलडाणेकरांना निसर्गाच्या या सौंदर्याचा लाभ झाला आहे.
१९९८ मध्ये एलनीनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात डिसेंबर जानेवारीत धुव्वाधार पाऊस झाला होता. त्या वेळीही असेच अभूतपूर्व धुके परिसरात पसरले होते. आज १६ वर्षांनंतर पुन्हा तशीच परिस्थिती बुलडाण्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे भर दिवसाही रस्त्याने वाहने चालवताना ‘हेड अँड टेल लॅम्प’चा सहारा घ्यावा लागला.
कवी बी यांनी १९३२ ते ३५ दरम्यान, लिहिलेल्या एक दृश्य या कवितेतील आशय निसर्गाने सध्या बुलडाण्यातील राजूर घाटावर जसाच्या तसा उभा केला आहे. बुलडाणा-मलकापूर मार्गाच्या फोटोवरून त्याची कल्पना येते. हिवाळ्यात पावसाळ्याचा अनुभव घेणाऱ्या बुलडाणेकरांना पाच ते दहा वर्षांतून हा अनुभव मिळतो. तसा या अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जवळपास १६ वर्षांनंतर बुलडाणेकरांना निसर्गाच्या या बदलाचा हा प्रकार पाहता आला. जानेवारीला सकाळपासूनच बुलडाण्यातील रस्ते घरे ही धुक्यामध्ये हरवली होती. बघता बघता धुक्यामध्ये संपूर्ण शहर हरवून गेले.

दृश्यता घटली
साधारणत:दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्ये हिवाळ्यात, पावसाळ्यात धुक्यामुळे दृश्यता घटत असते. मात्र, दोन दिवसांपासून वातावरणातील या बदलामुळे बुलडाण्यातील दृश्यताही घटली असून, पहाटे सायंकाळदरम्यान ती अवघी २० मीटरवर आली आहे. त्यामुळे वाहनांना भरदिवसा ‘हेड अँड टेल लॅम्प’च्या आधारावरच वाहने चालवावी लागली.
कमी तापमान,वाढती आर्द्रता धुक्यास कारणीभूत
शहराचे तापमान गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ते १२ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. त्यातच अवकाळी पाऊस आल्याने वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणावर वाढली. कमी तापमान आणि आर्द्रता वाढली की, धुके बनते. त्याचाच हा परिणाम असल्याचे बुलडाण्यातील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ तथा प्रकल्प समन्वयक डॉ. नितीन गुप्ता यांनी सांगितले.