आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला जिल्ह्यात अतिवृष्‍टीचा इशारा, प्रशासनास सतर्क राहण्‍याचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महान धरणाचे दहा, तर वान प्रकल्पाचे चार वक्रद्वार उघडली आहेत. जिल्ह्यात दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील महसूलच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी दिले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या महान धरणाचे दहा वक्रद्वार उघडण्यात आले. त्यामधून 230.598 घनमीटर प्रतिसेकंदप्रमाणे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. वान प्रकल्पाचे चार वक्रद्वार उघडण्यात आली. त्यामधून 13.46 घनमीटर प्रतिसेकंद याप्रमाणे पाण्याचा विसर्ग होत आहे तसेच पोपटखेड प्रकल्पातून 10.46 घनमीटर प्रतिसेकंद याप्रमाणे पाण्याचा विसर्ग होत आहे. शहानूर प्रकल्पातून 9.92 घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग करण्यात येत आहे. मागील 24 तासांत 255.00 मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
अकोला-अकोट मार्ग काही काळ बंद : जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. शहानूर नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे मंगळवारी सकाळी अकोला-अकोट रस्ता काही काळ बंद झाला होता. याशिवाय चोहोट्टाबाजार येथून करोडी फाटा, नांदखेड-टाकळी येथील पुलावर अकोट येथून वाहणार्‍या मोहाडी नदीचे पाणी वाढल्यामुळे हा रस्तादेखील बंद झाला होता. अकोला शहरानजीक असलेल्या चांदूर गावाचादेखील संपर्क तुटला आहे, तर काही गावांचा संपर्क तुटला किंवा नाही, याचा शोध घेणे सुरू आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.