आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जड वाहनांमुळे रहदारीला होतो अडथळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या ट्रान्सपोर्टनगरात शहरातील ५० टक्केच ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी आपली कार्यालये स्थानांतरित केल्याने महापालिका क्षेत्रातील वाहतुकीची कोंडी अद्यापही कायम आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही हे ट्रान्सपोर्टनगर शहरातील जड वाहनांची वाहतूक रोखू शकले नाहीत. व्यावसायिक तसेच प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मनपा क्षेत्रातील वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या हेतूने तत्कालीन जिल्हाधिकारी अनुपकुमार यांनी पुढाकार घेऊन २००१-२००२ ला औद्योगिक वसाहतीलगत ६५ हेक्टरवर ट्रान्सपोर्टनगर उभारण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ट्रान्सपोर्टनगरची संकल्पना राज्यात पहिल्यांदाच राबवली. या ६५ हेक्टर जागेत एकूण ६७९ प्लॉट पाडले. या ट्रान्सपोर्टनगरला ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी प्रतिसाद द्यावा, या हेतूने त्या वेळी हे प्लॉट ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना केवळ २० रुपये प्रती चौरस मीटर या भावाने दिले.. २००६ पर्यंत व्यावसायिकांनी केवळ प्लॉट खरेदी केले. प्रत्यक्ष बांधकाम मात्र केले नाही. मात्र, बालाजी ट्रान्सपोर्ट या कंपनीने सर्वप्रथम ट्रान्सपोर्टनगरात आपले प्रतिष्ठान सुरू केले. परंतु, अन्य ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी मात्र निरुत्साह दाखवला आहे. अद्यापही २०० ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांपैकी केवळ १०० च्या जवळपास व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने ट्रान्सपोर्टनगरात सुरू केली आहेत.
बाजार कळीचा मुद्दा
शहराच्या मध्य भागात किराणा, धान्य, कापड बाजार आहे. या बाजारात मालाची ठोक विक्री केली जाते. तसेच अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीतही कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. जकात नाक्यामुळे व्यावसायिकांनी आपला व्यवसाय महापालिका क्षेत्राबाहेर स्थानांतरित केला होता. परंतु, जकात कर बंद होऊन एलबीटी सुरू झाल्यानंतर पुन्हा व्यावसायिकांनी आपला व्यवसाय मनपा क्षेत्रात सुरू केला.
रजिस्ट्रेशनमुळे फायदा
एकीकडे तत्कालीन जिल्हाधिकारी अनुपकुमार औद्योगिक वसाहतीलगतची जागा ट्रान्सपोर्टनगरसाठी मिळावी म्हणून प्रयत्न करीत होते, तर माजी आरोग्य राज्यमंत्री प्रमिलाताई टोपले या ही जागा मेडिकल काॅलेजसाठी मिळावी, यासाठी प्रयत्न करीत होते. त्या वेळी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांच्या संघटनेचे रजिस्ट्रेशन झाले नसते तर कदािचत ही जागा ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी उपलब्ध झाली नसती.
दररोज दोन हजार जड वाहनांची हाेते ये-जा
विदर्भात सर्वांत मोठा ट्रान्सपोर्ट झोन : औद्योगिक वसाहतीत ३५० दाल व ऑइल मिल्स असल्याने व येथून भारताच्या कानाकोपऱ्यात डाळ पाठवली जाते, त्यामुळे विदर्भातील सर्वांत मोठा ट्रान्सपोर्ट झोन म्हणून अकोला ट्रान्सपोर्टची गणना केली जाते.
सुविधांचा फायदा काय? : ट्रान्सपोर्ट नगरात विद्युत, पथदिवे, रस्ते, पाणी आदी सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधा उपलब्ध करूनही ट्रान्सपोर्टनगरची संकल्पना पूर्णपणे अस्तित्वात आलेली नाही. त्यामुळे या सुविधांवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही काहीही फायदा झालेला नाही.

यांनी घेतला होता पुढाकार : ट्रान्सपोर्टनगर ही संकल्पना पूर्ण होण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अनुपकुमार, रतनलाल शर्मा, धरमवीरसिंग ओबेरॉय, दुर्गा भय्या, हुसेन अली, जुगल किशोर बियाणी अादींनी महत्त्वाची भूिमका निभावली होती.
या मार्गावर होते कोंडी : ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची प्रतिष्ठाने महापालिका क्षेत्रात असल्याने रेल्वे चौक ते अशोक वाटिका चौक, अग्रसेन चौक ते अब्दुल हमीद चौक, टिळक मार्ग, रेल्वेस्थानक चौक ते अकोटफैल, टाॅवर चौक ते फतेह चौक ते दीपक चौक या मार्गावरील वाहतुकीची सातत्याने कोंडी होते.