आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला जिल्ह्यातील 65 गावांना सतर्कतेचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अकोला जिल्ह्यातील 65 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे महान, वान व दगडपारवा या धरणाचे प्रत्येकी चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. मागील 24 तासांत 186 मिमी. पावसाची जिल्हा प्रशासनाने नोंद केली आहे.

संततधार पावसामुळे अकोला जिल्ह्यातील प्रकल्पांत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. पावसामुळे नागरिकांना घरातच थांबावे लागले आहे. याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर झाला आहे. शाळा, महाविद्यालयातही पावसाचा परिणाम दिसून आला आहे. अनेक विद्यार्थ्यांना पावसामुळे शाळेत जाता आले नाही. शासकीय कार्यालयात नियमित दिसणारी गर्दी पावसामुळे दिसून आली नाही. शहरातून वाहणार्‍या मोर्णा नदीला पूर कायम आहे. पूर पाहण्यासाठी नागरिकांनी निमवाडी पुलावर गर्दी केली होती.

सर्वाधिक पाऊस पातूर तालुक्यात
मागील 24 तासांत अकोला तालुक्यात 19.20 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली. यासोबतच बार्शिटाकळी तालुक्यात 30.00 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली. अकोट तालुक्यात 30.00 मिमी., तेल्हारा तालुक्यात 16.00 मिमी., बाळापूर तालुक्यात 30.00 मिमी., पातूर तालुक्यात 44.00 मिमी. व मूर्तिजापूर तालुक्यात 17.00 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक पाऊस पातूर तालुक्यात 44 मिमी. पडला, तर सर्वात कमी पाऊस मूर्तिजापूर तालुक्यात झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. 1 जून ते 2 ऑगस्टपर्यंत एकूण 4,501.52 मिमी. पाऊस पडला आहे.

या मार्गावरील वाहतूक बंद
अकोला-म्हैसांग, अकोला-तेल्हारा, अकोला-अकोट, निंबा-लोहारा, अकोला-लोहारा, निमकर्दा-शेगाव, बाळापूर-पातूर, मूर्तिजापूर-दर्यापूर, अकोला-गाझीपूर, पळसो-कौलखेड, अकोला-धोतर्डी, अकोला-सांगळूद, मूर्तिजापूर-म्हैसांग मार्गे अकोला, अकोला-पिंजर, बार्शिटाकळी-पिंजर यांसह अकोला जिल्ह्यातील काही मार्गांवरील वाहतूक काही काळ बंद होती.

अधिकारी व कर्मचार्‍यांना सतर्क राहण्याचे आदेश
नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने महसूलच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोणतीही नैसर्गिक आपत्ती घडल्यास तत्काळ जिल्हा प्रशासनाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाला कळवावे, असे आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी दिले.

जिल्ह्यातील मोर्णा, निगरुणा व उमा प्रकल्प झाले ‘ओव्हरफ्लो’
अकोला जिल्ह्यातील मोर्णा, निगरुणा व उमा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. मोर्णा प्रकल्पातून 70.09 दलघमी. पाण्याचा विसर्ग होत आहे. निगरुणा प्रकल्पातून 107.31 दलघमी. पाण्याचा विसर्ग होत आहे तसेच उमा प्रकल्पातून 149.72 दलघमी. पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दगडपारवा प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून 10.52 दलघमी. पाण्याचा विसर्ग होत आहे. वान प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले. यातून 97 दलघमी. पाण्याचा विसर्ग होत आहे.