आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टपाल कार्यालय हायटेक; सहा जूनपासून सुरू झाली ‘सीबीएस‘ प्रणाली कार्यान्वित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - टपाल खात्यांतर्गत कोअर बँकिंगसोल्युशन (सीबीएस) प्रणाली विकसित करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला असून, खामगावनंतर बुलडाणा शहरातील अधीक्षक डाक घरामध्येही सीबीएस प्रणालीनुसार 6 जूनपासून कामकाज सुरू झाले आहे. दरम्यान, या प्रणालीचा पुढील टप्पा नेट बँकिंग व टपाल खात्याचे एटीएम लावण्याच्या प्रक्रियेनेही वेग घेतला आहे.

त्याअंतर्गत पुढील सहा महिन्यांत खामगाव व बुलडाणा शहरात टपाल खात्याचे स्वतंत्र एटीएम लागल्यास नवल वाटायला नको. परिणामी, एखाद्या बँकेप्रमाणेच आता टपाल खात्यात दैनंदिन व्यवहार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कुरिअर सर्व्हिस आणि काही खासगी सेवांनी टपाल कार्यालयासमोर निर्माण केलेल्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयटी प्रोजेक्ट 2012 अंतर्गत टपाल सेवेमध्ये आमूलाग्र बदल करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून या सुविधेकडे बघितल्या जात आहे. दरम्यान, राज्यात पहिले आॅनलाइन पोस्ट आॅफिस खामगावमध्ये कार्यान्वित झाल्यानंतर दुसर्‍या टप्प्यात बुलडाणा येथे ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. यापुढील टप्प्यात बुलडाण्यातील चैतन्यवाडी, मलकापूर, शेगाव, नांदुरा आणि मोताळा येथे ही सुविधा मिळणार आहे.

नागपूर विभागांतर्गत टप्प्याटप्प्याने हे आधुनिकीकरण होत असून, परतवाडा, नागपूर येथे अद्यापही सुविधा सुरू झालेली नाही. बाकी विदर्भातील मुख्य असलेल्या अधीक्षक डाक घर कार्यालयामध्ये या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. बुलडाणा येथे ही सुविधा कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने प्रारंभी दोन ते तीन तारखा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर 6 जूनपासून ही सुविधा येथे सुरू झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सर्व 35 टपाल कार्यालयांमध्ये आगामी वर्षामध्ये ही सुविधा सुरू होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
सुविधेचा फायदा काय?
टप्प्याटप्प्याने ही सुविधा जिल्ह्यातील टपाल कार्यालयात सुरू होत असून, ती पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर आवर्ती ठेव, मुदत ठेव, मंथली इनकम स्कीम, पब्लिक प्रॉव्हीडंड फंड, सीनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीमसह पोस्टाच्या सर्व सुविधा आॅनलाइन मिळतील. वानगी दाखल खामगाव येथे एखाद्याचे बचत खाते टपाल कार्यालयात आहे. त्याला त्यात पैसे भरावयाचे असल्यास खामगावलाच जावे लागते. मात्र, ही सुविधा कार्यान्वित झाल्याने जिल्ह्यातील अथवा राज्यातील कुठल्याही टपाल कार्यालयात जाऊन तो त्याच्या खात्यात पैसे जमा अथवा काढू शकतो. एकंदरीत अन्य कोअर बँकिंगप्रमाणेच टपाल कार्यालयाची सेवा सुरू होईल.
सहा महिन्यांत एटीएम सुविधा
टपाल खात्याची येत्या 6 महिन्यांमध्ये खामगाव व बुलडाणा येथे एटीएम सुविधा सुरू होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानुषंगाने सध्या वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर खात्याचे स्वतंत्र असे एटीएम त्यांच्या ग्राहकांना मिळेल.
लिंकिंगची समस्या
6 जूनपासून ही सीबीएस प्रणाली बुलडाणा मुख्य टपाल कार्यालयामध्ये सुरू झाली मात्र, त्यात लिंकिंगची समस्या आहे. प्रभावी व सुरळीतपणे ही सुविधा कार्यान्वित होण्यात आणखी कालावधी जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात 35 टपाल कार्यालये
जिल्ह्यात एकूण 35 टपाल कार्यालय आहेत. खामगाव आणि बुलडाणा येथे ही सुविधा आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने खामगावातील 17 आणि बुलडाण्यातील 18 कार्यालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध होत आहे.
(फोटो - बुलडाणा येथील मुख्य टपाल कार्यालयाची इमारत.)